Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:53 AM2023-06-17T11:53:39+5:302023-06-17T11:55:39+5:30

आषाढी वारी पालखी प्रस्थान दिवशी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि पोलिसांची झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला...

finally after 'that' incident, Alandi Devasthan made an official stand pune news | Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली

Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली

googlenewsNext

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदीत श्री. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच ११ जूनला वारकरी विद्यार्थी आणि पोलिस यांच्यातील घडलेला प्रसंग सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय खेदकारक आणि अनुचित होता. थोडं सामंजस्य दाखवून तो प्रसंग टाळता आला असता. त्यामुळे सेवा, शिस्त, सारासार विचार आणि भावना यांचे संतुलन येत्या काळात सर्वांनाच पाळावे लागणार असल्याची भावना आळंदी देवस्थानने एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. आळंदीत प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी वारकरी व पोलिसांमध्ये घडलेल्या 'त्या' घटनेच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने पाच दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१६) आपली अधिकृत भूमिका लेखी निवेदनाद्वारे मांडली आहे.

आषाढी वारी पालखी प्रस्थान दिवशी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि पोलिसांची झटापट झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. याबाबत राज्यात वारकऱ्यांना मारहाण झाल्याचा दावाही राजकीय पक्षांनी व वारकरी संघटनानी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मात्र मारहाण झाली नसल्याचा खुलासा केला. याबाबत आळंदी देवस्थानने मात्र अद्यापपर्यंत अधिकृत भूमिका मांडली नव्हती.

अखेर देवस्थानच्यावतीने निवेदनाद्वारे पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे आणि प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रस्थान सोहळ्यात देऊळवाड्याबाहेर झालेल्या घटनेबाबत पार्श्वभूमी मांडली. देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले की, मंदिराचे आवार आणि प्रस्थानासाठी दरवर्षी वाढत जाणारी गर्दी पाहता मंदिरात जमणारे वारकरी व दिंडीकरी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रवेश किती जणांना द्यायचा, हा नेहमीच कळीचा मुद्दा होता. भावनेईतकाच कायदा सुव्यवस्थाही महत्त्वाची आहे. मांढरदेवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील संख्येवर मर्यादा असावी असे अनेक निर्देश प्राप्त झाले होते. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. दिंडीकरी, फडकरी, व मानकरी आदींनी सोहळ्यातील संबंधित घटकांनी विवेक बाळगून प्रस्थान सोहळा साजरा केला.

प्रस्थान सोहळ्यात मंदिर प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यामागे संस्था कमिटीचा स्वार्थ नाही. अथवा, कोणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचित करावे व भेदभाव करावा, असा हेतू नाही. अनुचित घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वारकरी विद्यार्थ्यांसह सर्व संबंधितांनी देवस्थानला यापुढेही किंतू न बाळगता सहकार्य करावे.

Web Title: finally after 'that' incident, Alandi Devasthan made an official stand pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.