पुणे : महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अद्यापही शोधकार्य सुरु असून काही नागरिक बेपत्ता आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. पण आता हेच 'माळीण' सामाजिक बांधिलकी जपत तळिये गावाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे.
कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, चिपळूण, पुणे, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून जनावरे वाहून गेली आहेत तर लाखांवर नागरिकांचे स्थलांतरण कऱण्यात आले आहे. महाड तालुक्यातील तळीये गावावर देखील दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक कुटुंब जमीनदोस्त झाली. तसेच जवळपास ढिगाऱ्याखालून तब्बल ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून. अद्यापही ३२ नागरिक बेपत्ता आहे येथील नागरिकांवर या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे. राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील तळीये गावाच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील माळीण गावाने आदर्श उभा केला असून तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत दिली आहे.
माळीणच्या नागरिकांनी तळीये गावाच्या मदतीसाठी २५ हजारांचा धनादेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला आहे.या पार्श्वभूमीवर माळीणच्या नागरिकांनी तळीये गावावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटावर आपल्या भावना व्यक्त करताना ''आम्ही तुमचं दुःख जाणतो..'' म्हटले आहे. माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी २५ हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.
७ वर्षांपूर्वीच्या 'त्या' काळरात्रीची आठवण ताजी....पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर देखील ३० जुलै २०१४ च्या रात्री मोठं संकट कोसळले होतं. डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर १५१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या ६ वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांनी तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे.
जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा; तळीये ग्रामस्थांची मागणी तळीये येथे मागील पाच दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आजही पथकांकडून सुरु असलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. मात्र यावेळी नागरिकांनी पथकाला जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी केली.याचवेळी आमच्या पुनर्वसनाचा तातडीने विचार करून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.