शेतातील जाळ्यात अडकलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या नर मादीला इंदापुरात जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 07:28 PM2017-12-11T19:28:25+5:302017-12-11T19:31:49+5:30
इंदापूर तालुक्यातील बनकर वाडीतील एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास प्राध्यापक सोपान भोंग यांनी जीवदान दिले आहे.
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील बनकर वाडीतील एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास प्राध्यापक सोपान भोंग यांनी जीवदान दिले आहे.
बनकरवाडी येथील तानाजी बनकर यांच्या घराजवळ डाळिंबाच्या बागेला संरक्षक नेटच्या जाळीत साप अडकल्याचे प्रवीण व विकास बनकर या युवकांनी सर्पमित्र प्रा. सोपान भोंग यांना कळविले. भोंग यांनी तातडीने बनकर वाडीत जाऊन पाहिले असता जाळीमध्ये दोन पूर्ण वाढ झालेले अति विषारी घोणस जातीचे साप असल्याचे सांगितले अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर कात्री ब्लेडच्या साहयाने गुंतलेल्या सापाच्या अंगावरील नायलॉन ची जाळी दूर करून दोन्ही सापास वाचवून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. सापाविषयी माहिती सांगताना भोंग म्हणाले, की भारतामध्ये आढळणाऱ्यां सापांपैकी घोणस हा विषारी सर्प आहे. या सापाची लांबी साधारण तीन ते साडे पाच फुटापर्यंत असते. त्याचा रंग तपकिरी किंवा हिरवट रंग असतो. पाठीवर तीन टिपके असतात. स्थूल व आखूड शेपटी त्रिकोणी डोके असते.
शेताच्या कंपाऊंडच्या जाळ्यामध्ये अडकून दरवर्षी शेकडो साप मृत्यूमुखी पडतात त्या साठी शेतकऱ्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. साप हे शेतकऱ्यांचे मित्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांना वाचवण्याचे आवाहन भोंग यांनी केले.