सातव्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:43 PM2017-11-13T20:43:06+5:302017-11-13T20:43:50+5:30
गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : सातव्या मजल्याच्या गॅलरीमधील रेलिंगच्या काढलेल्या काचांच्या गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष शर्मा (साईड सुपरवायझर), सुनील काळे व दिनेशकुमार यादव ( ठेकेदार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रविवारी सातव्या मजल्याच्या बाल्कनीमधून खाली पडल्याने अडीच वर्षाच्या मिती मनिशकुमार जैन या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचे वडील मनीष जैन यांनी दिलेल्या फियादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील शांतीनगर सोसायटीचे बांधकाम पुण्यातील प्रसिद्ध सुराणा, मुथा व भन्साळी या बांधकाम व्यावसायिकांनी केले आहे. मात्र बांधकाम व्यवसायिकांनी बिल्डिंगच्या रेलिंगच्या काचांना सेफ्टी फिल्म बसविण्याचे काम सांगताना योग्य त्या सूचना दिल्या नाहीत.
सुपरवायझर आणि ठेकेदार काळे व यादव यांनी फिर्यादीच्या सातव्या मजल्यावरील फ्लँटच्या गँलरीमध्ये असलेल्या रेलिंगच्या काचा दुरूस्तीसाठी काढून ठेवल्या. त्याठिकाणी सुरक्षेसाठी प्लायवुड किंवा पत्रा लावणे अथवा सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक होते मात्र तसे न केल्याने अडीच वर्षीय मिती ही खेळत असताना सातव्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसानी तपासाअंती सुपरवाझर आणि ठेकेदारावर सोमवारी
गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.