पुणे, दि. 17 - उद्योजक आणि भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू कोपरे गावातील 17 एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर असून, या प्रकरणी कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे यांच्यासह अशोक यादव आणि अन्य एकाविरोधात भादंवि कलम 420, 406, 467 आणि 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू कोपरे गावातील रहिवाशांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने या प्रकरणात चौकशी करून काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक खासदार संजय काकडे, सूर्यकांत काकडे आणि इतर संचालकांची फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ई. टी. गोटे यांनी दिले होते. मात्र काकडे यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले आहेत.न्यू कोपरे गावातील रहिवाशांनी १४ एकर जमीन सूर्यकांत काकडे यांना विकसनासाठी दिली होती. मात्र कागदपत्रात खाडाखोड करून एकूण ३८ एकर जमीन घेण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यापैकी महापालिकेला ७ एकर जमीन ‘अॅमिनिटी स्पेस’ म्हणून देण्यात आली. उर्वरित १७ एकर जमीन काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने बळकावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यातील काही भागावर बांधकाम करण्यात आले, तर काही भागातील प्लॉट विकण्यात आले. याबाबत गावकºयांनी न्यायालयात धाव घेतली होती. एक रहिवासी दिलीप मोरे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रथमवर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे दिसत असल्याने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.काकडे यांच्याकडून यापूर्वी मांडलेल्या भूमिकेनुसार, पुनर्वसनाचा हा अधिकार जिल्हाधिका-यांकडे होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या यादीनुसार पुनर्वसन करण्यात येत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करायला हवा. काही जणांची घरे नियमानुसार तयार करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी घेतलेली नाहीत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाबाबत संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
उद्योजक आणि भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 2:24 PM