पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बोगस ठरवल्यानंतर दोन संस्थांनी नाव बदलून पैसे घेऊन बेकायदेशीर पदव्या वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. अभिषेक सुभाष हरिदास (वय ३७, रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या दोन संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या आरोपी संस्थांना बोगस म्हणून जाहीर केले आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही संस्था दिल्ली येथील आहे. ही संस्था स्वत:ला विद्यापीठ म्हणवून घेत आहे. तर पिंपळे निलख येथील नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस ही संस्था या विद्यापीठाचे कॉलेज असल्याचे दाखवत आहे. या दोन्ही संस्थांनी आपसात संगनमत करून नाव बदलून अनधिकृतपणे लोकांकडून पैसे घेऊन पदव्या वाटप करण्याचे काम केले आहे. याबाबत दोन्ही संस्थांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.