पुणे : पुण्यातील वडारवाडी भागात मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे 15 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. कोणीही जखमी झाली.अग्निशमन दलाने सुमारे तासभर पाण्याचा मारा करून ही आग विझवली. मात्र या घटनेमागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वडारवाडी भागात रात्री 2 वाजून 3 मिनिटांनी आग लागली असल्याचा फोन अग्निशमन दलाला आला. त्यानंतर 9 पाण्याच्या गाड्या, 3 टँकर आणि 3 देवदूत गाड्यांच्या मदतीने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करून त्यांनी 3 वाजून 7 मिनिटांनी आग विझवली. अग्निशमन दल पोचण्याआधी घटनास्थळी 2 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, 'आग मोठी होती. मात्र चारही बाजूंनी मारा केल्यामुळे लवकर आटोक्यात आणणे शक्य झाले. आम्ही येण्याआधी 7 ते 8 झोपड्या जळल्या होत्या. आगीचे कारण अजून तरी समोर आलेले नाही. या कामगिरीत अग्निशमन दलाचे 40 ते 50 कर्मचारी सहभागी झाले होते'.