पुणे : कर्वे रत्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ असणाऱ्या काम सुरु असलेल्या एका इमारतीमधल्या बांधकामाच्या साहित्याला बुधवारी दुपारी अाग लागली. प्लॅस्टिकटचे बरेचसे सामान असल्याने अाग झपाट्याने पसरली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरात अागीवर नियंत्रण मिळवले. अाग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, या अागीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. अागीत बांधकामाचे साहित्य जळाले. अग्निशामक दलाचे अधिकारी रमेश गांगड यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 2.57 ला अाग लागल्याची माहिती मिळाली. लगेचच एंरडवणा, काेथरुड, कसबा पेठ अाणि भवानी पेठेतील अग्निशामक दलाच्या गाड्या व टॅंकर घटनास्थळी रवाना झाले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बांधकामाच्या साहित्याचे गाेडावून हाेते. त्याला पत्र्याने बंदिस्त केले असल्याने अग्निशामक दलाला अाग विझवताना काहीश्या अडचणी अाल्या. शिडीच्या सहाय्याने वरती जात सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात अाला. तासाभरात संपूर्ण अागीवर नियंत्रण मिळविण्यात अाले. गाेडाऊनमध्ये रबरी मॅट, प्लॅस्टिकचे पाईप असल्याने सर्वत्र धूर पसरला हाेता. अाग लागली त्यावेळी त्या ठिकाणी काेणी नव्हते त्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या 12 जवानांनी 4 फायर गाड्या व 2 फायर टॅंकरच्या मदतीने ही अाग अाटाेक्यात अाणली.
कर्वे रस्त्यावरील इमारतीमधील बांधकामाच्या साहित्याला अाग, जीवीत हानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 6:33 PM