सातारा रस्त्यावरील पॅकिंगच्या कंपनीत भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:28 AM2018-11-28T11:28:39+5:302018-11-28T11:35:11+5:30
सातारा रस्त्यावरील एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागली.
पुणे : सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्ससमोर असलेल्या एका पॅकिंगच्या कंपनीत पहाटे भीषण आग लागून त्यात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले़. भापकर पेट्रोल पंपाच्यामागे पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शिरुरकर सॉ मिल ही पॅकिगचे मटेरियल तयार करणारी कंपनी आहे़.या कंपनीत पहाटे तीन वाजता अचानक आग लागली़. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कंपनीचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशामक दलाला पहाटे तीन वाजता या आगीची माहिती मिळाली़.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा कंपनी बंद होती़. कंपनीत रखवालदारही दिसून आले नाहीत़. अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या़ मोठ्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी तळाला जो लाकडाचा सांगाडा तयार केला जातो़, त्याचे काम या कंपनीत केले जाते़. सुमारे १० हजार स्क्वेअर फुटच्या आवारात ही आग लागली होती़.अग्निशामक दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने पहाटे ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले़. येथे मोठ्या प्रमाणावर लाकडी फळ्या ठेवण्यात आल्या आहेत़. आगीत त्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या़. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग अधिक पसरून नेणे व चांगल्या मालापर्यंत पोहचू नये, म्हणून काळजी घेतल्याने तयार माल आगीपासून वाचला आहे़. त्यावेळी कंपनी बंद होती़. कंपनीत रखवालदारही दिसून आले नाहीत़.
लाकडी फळ्यांना आग लागून त्याचे निखारे झाले असल्याने अधून मधून त्यातून धूर येत आहे़. जेसीबीच्या सहाय्याने या जळालेल्या फळ्या बाजूला करुन त्यांना विझविण्याचे काम गेल्या ७ तासापासून सुरु आहे.