जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:13 PM2021-06-05T15:13:39+5:302021-06-05T21:22:52+5:30

वारजे भागात बांधकाम ठेकेदारावर गोळीबार, सतर्कतेमुळे वाचला जीव, हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

Firing on estate agent near Chandni Chowk in pune | जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव

जमीन खरेदी - विक्री करणार्‍यावर पुण्यातील चांदणी चौकाजवळ गोळीबार; थोडक्यात वाचला जीव

googlenewsNext

पुणे : वारजे भागातील डुक्कर खिंड परिसरात मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी बांधकाम ठेकेकदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली.  ठेकेदार वेळीच सावध झाल्याने ते पळाल्याने या हल्ल्यातून बचावले. हल्लेखोरांनी सुरुवातीला अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्तयातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६, रा. वारजे) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. तागुंदे यांचे वारजे परिसरातील मुंबई -बंगळुरु बाह्यवळण रस्त्यावरील सर्व्हिस रोडला वंडर फ्युचरा इमारतीत कार्यालय आहे. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तागुंदे हे शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कार्यालयासमोर आले. रस्त्याच्या कडेला कारमधील व्यक्तीशी ते बोलत होते. त्याचवेळी पाठीमागून एका मोटारसायकलवरुन दोघे जण आले. ते रस्त्याने सरळ जाण्याऐवजी रस्त्यांच्या कडेला जागा नसतानाही त्यांनी त्यांच्या बाजूला मोटारसायकल घातल्याने तागुंदे यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तेव्हा पाठीमागे बसलेल्याच्या हातातील पिस्तुल पाहून ते पटकन खाली वाकले. तेव्हा हल्लेखोरांनी अगदी जवळून एका पाठोपाठ २ गोळ्या झाडल्या. पण तागुंदे वाकल्यामुळे त्यांचा नेम चुकला. ही संधी साधून तागुंदे पटकन मागच्या बाजूला पळाले. त्यानंतरही हल्लेखोराने आणखी दोन गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्या. या हल्लेखोरांच्या पाठोपाठ आणखी दोघे जण मोटारसायकलवरुन तेथे आले. सुदैवाने तांगुदे हे पळाल्याने बचावले. आपला हल्ला वाया गेल्याचे लक्षात आल्यावर हल्लेखोर परत उलट्या दिशेने पळून गेले. 
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

तागुंदे यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात या हल्ल्याची दृश्ये कैद झाली आहेत, मात्र,  ती बर्‍याच लांबवरुन टिपली गेली आहेत. हल्लेखोरांचा माग करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

तागुंदे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी त्यांची दोन खुन प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. पूर्ववैमनस्य किंवा आर्थिक वादातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Firing on estate agent near Chandni Chowk in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.