पुणे : सध्या महापालिकेचे ५२ बाह्यरुग्ण विभाग आणि १९ प्रसूतीगृहे कार्यरत आहेत. बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खाेकला, ताप अशा सामान्य आजारांवर उपचार देण्यात येतात. साेबत रक्त तपासणी, लसीकरणही करण्यात येते. प्रसूतीगृहात गर्भवतींवर उपचार, साेनाेग्राफी, लसीकरण करण्यात येते. मात्र, या सुविधांवर ताण येताे. ताे कमी करण्यासाठी आता पुणे जिल्ह्यात ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या याेजनेअंतर्गत १ मे पासून १० ठिकाणी हे दवाखाने नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी एक दवाखाना हा शहरात म्हणजे वाघाेलीत असणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’ प्रमाणे या दवाखान्यांच्या माॅडेलची तुलना केली जात आहे. राज्यात असे ७०० दवाखाने सुरू केले जाणार आहेत. यामुळे मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, दर २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या वस्तीसाठी हा ‘आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. शहरात हा पहिला दवाखाना वाघाेली येथे सुरू हाेणार आहे. उर्वरित ग्रामीण भागात असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला मुंबईत अशा २० दवाखान्यांचे उदघाटन झाले हाेते.
विशेष म्हणजे, हे दवाखाने दिवसभर आणि रात्री उशिरार्यंत सुरू राहतील. कारण, शहरात तसेच ग्रामीण भागांमध्ये अनेक कर्मचारी, नागरिक संध्याकाळी उशिरापर्यंत काम करतात. शासकीय दवाखाने ६ वाजेपर्यंत बंद होत असल्याने अनेकांना उपचारांपासून वंचित रहावे लागते. सर्वांना उपचार घेता यावेत, यासाठी ही याेजना राबवण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आराेग्य विभागाचे प्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी दिली.
समाविष्ट गावांसाठी आराेग्यवर्धिनी केंद्र
दरम्यान, पुणे शहरामध्ये समाविष्ट गावांमधील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथे २९ आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी ९ केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे.
काय आहे ‘आपला दवाखाना’ या केंद्राचे वैशिष्ट्ये :
- दवाखान्यांची वेळ सकाळी सात ते दुपारी दाेन आणि दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. रुग्णांना केसपेपर काढावा लागेल.
- डाॅक्टरांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल.
- दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल.
- रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण, निदान केलेली पद्धती याची माहिती घेतली जाईल.
- येथे १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील.
- ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ हे दवाखाने असतील.