- युगंधर ताजणे
पुणे : समिर आणि अमितला काही झालं तरी त्यांना त्यांचं नात समाजापासून लपवून ठेवायचं नव्हतं. यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असा विचार त्यांनी केला होता. म्हणून तर भारतात समलैंगिकांच्या लग्नाला परवानगी नसताना त्यांनी अमेरिकेत जावून लग्न केले. मागील वर्षी हे जोडपं भारतात परतले. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना देखील मुलभूत अधिकार. असा निर्णय दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर समिर आणि अमितच्या ’’लग्नाची’’ गोष्ट पुढे आलीआहे. लग्न करणारे ते महाराष्ट्रातले पहिले ‘‘गे कपल’’ आहे. ते दोघेही इंजिनिअर असून एमबीएची देखील पदवी आहे. ते मागील पंधरा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. दोघांना परदेशात राहून आपल्या प्रेमाला लग्न करुन कायदेशीररीत्या त्या नात्याला नाव द्यावेसे वाटले. समीर समुद्र आणि अमित गोखले यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना सतत आजुबाजुच्या लोकांकडून, नात्यातील काही व्यक्तींकडून, भलते सलते ऐकावे लागले. अनेक मित्रांकडून देखील त्यांच्या दुहेरीपणाने वागण्याचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला. मात्र त्यांनी तो सहन केला. ‘‘आम्ही जसे आहोत तसे आहोत. आमची काळजी समाजाने करण्याची गरज नाही. आम्हाला एकमेकांबद्द्ल जे काही वाटते ते सर्वकाही आमच्या दोघांचेच आहे.’’ समिर आणि अमितचे त्यांच्या नात्याबद्द्ल इतकी स्पष्ट् मते असताना देखील संकु चित मनाच्या व्यक्तींनी त्यांना कायमच दुषणे देवून त्यांचा मानसिक छळ करण्यात धन्यता मानली. समीरला त्याच्या आणि अमितच्या नात्याविषयी विचारले असता त्याने सांगितले, आमचे एकमेकांवर प्रेम होते. मी पहिल्यांदा माझ्या घरच्यांना आमच्या संबंधाबद्द्ल सांगितले. घरच्यांना समलैंगिकता म्हणजे काय याविषयी काहीच माहिती नव्हते. त्यांच्याकडून खुप विरोध झाला. मात्र आम्ही दोघेही आमच्या नात्याविषयी ठाम होतो. ज्याठिकाणी अमित आणि समिर काम करतात त्याठिकाणी देखील त्यांच्या नात्याला मोकळेपणाने स्वीकारले गेले. सहका-यांना आमच्या नात्याविषयी माहिती असल्याने त्यांनी कालांतराने आम्हाला त्रास देणे कमी केले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात प्रेम व आपुलकी दिसून आली, अशी भावना समीर व्यक्त करतो. आम्हाला आमच्या नात्याविषयी अभिमान असून त्याविषयी ना खंत ना कुठली अडचण या शब्दांत अमित आपला रोखठोकपणा मांडतो.
डोळ्यात आनंदाश्रू-जी गोष्ट कधीच होवू शकणार नाही अशी भावना कायम मनात ठेवून चाललो होतो शेवटी ती प्रत्यक्षात आल्यानंतर खुप आनंद झाला. मी आणि अमित आम्ही दोघेही कमालीचे भावनाप्रधान झालो होतो. -सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तो ऐकल्यावर सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिटं आम्ही दोघेही रडत होतो. आमच्या डोळ्यात आनंदाश्रु होते.-आता या निर्णयाचे मोठे सेलिब्रेशन करणार असून मित्रांना जंगी मेजवानी देणार असल्याचा बेत समीरने बोलून दाखवला.