मंचर : लहान मुलांसाठी मंचर शहरात सुरू करण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम या कोरोना सेंटरमधून पहिला बालरुग्ण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून घरी परतला आहे. सध्या या ठिकाणी सोळा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंचर शहरातील लोकमान्य प्रतिष्ठान व बीफोरएस सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्यधाम हे चाइल्ड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. फक्त लहान मुलांसाठी असलेले हे एकमेव कोविंड सेंटर आहे. सेंटरमध्ये उपचारासाठी लहान मुलांना दाखल करण्यात आले. सर्वप्रथम उपचारासाठी दाखल झालेल्या दोन वर्षीय लहान मुलाने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. या मुलाला माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आईवडिलांकडे सुखरूपपणे सुपूर्द केले.
कोरोनाच्या महासंकटाशी मुकाबला करून आईवडिलांच्या कुशीत विसावलेल्या या मुलाने हसून आपला आनंद व्यक्त केला. सध्या या कोविड सेंटरमध्ये सोळा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या चाइल्ड कोविड सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे लहान मुलांसाठी अनेक खेळणी व मनोरंजनात्मक साहित्य असल्याने मुले येथे रमतात. त्यांना कुटुंबापासून दूर असल्याचे जाणवत नाही. शिवाय कोरोनाबाधित लहान मुलांना आहार देण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. अनेकदा त्यांच्या मनासारखे खाणे त्यांना उपलब्ध करून दिले जाते.
या सेंटरमध्ये डॉ. सोमेश्वर टाके, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जगदाळे,डॉ. सदाकतअली सय्यद तसेच इतर परिचारिका लहान मुलांची विशेष काळजी घेतात. येथील सोयीसुविधांमुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो. ते पाहून कष्टाचं चीज झाल्याचे समाधान वाटतं. पालकांनी देखील घाबरून न जाता लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन दत्ता गांजाळे, सुजित देशमुख यांनी केले आहे.