नीरा भीमाचे साडेपाच लाख टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:05+5:302021-02-26T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या यशस्वी गळीत हंगामाची सांगता माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गव्हाणपूजन करून बुधवारी करण्यात आली. कारखान्याने १३० दिवसांत चांगले नियोजन करीत ५ लाख ६० हजार टन उसाचे गाळप करून उत्कृष्टरीत्या हंगाम पार पाडल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, की कारखान्याचा चालू गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, गळीत हंगाम हा कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने अपेक्षेपेक्षा लवकर संपवावा लागला. या हंगामात कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २ कोटी ८० लाख युनिटची विक्री करण्यात आली. आसवणी प्रकल्पातून ६३ लाख लि.चे उत्पादन घेण्यात आले आहे. आजपर्यंत इथेनॉलचे ४३ लाख लिटरचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पातून १५ लाख घनमीटर बायोगॅस निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे ३५०० मे.टन बगॅस बचत झाली आहे. कृषिरत्न सेंद्रिय खताचे उत्पादनाचे २ लाख बॅग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील सहकार क्षेत्रातील पहिला बायो-सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प नीरा भीमा कारखाना उभारणार आहे, अशी माहिती या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी केले. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जामदार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष घोगरे यांनी केले.