साडेपाच लाख स्वयंसेवक कोरोनाविरुद्धच्या लढ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:03+5:302021-03-25T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूचे संकट आले. या संकटकाळात गेल्या वर्षी २२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूचे संकट आले. या संकटकाळात गेल्या वर्षी २२ मार्चपासून संघ स्वयंसेवकांनी देशभरात सेवाभारतीच्या माध्यमातून ९२ हजार ६५६ ठिकाणी सेवाकार्य केले. सुमारे ५ लाख ६० हजार स्वयंसेवक या कार्यात सहभागी झाले. संकटकाळात झोकून देऊन सेवाकार्य उभे करण्याची संघाची परंपरा आहे. यातूनच संघाने देशभरात लक्षणीय सेवाकार्य केले,” अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी दिली.
बुधवारी (दि. २४) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रा. स्व. संघाचे पुणे शहर कार्यवाह महेश करपे यांनी यावेळी पुण्यातील सेवाकार्याची माहिती दिली. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुण्याचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र जोशी यांनी आभार मानले.
डॉ. दबडघाव म्हणाले की, गेल्या वर्षी साधारण २२ मार्चपासूनच संघाचे स्वयंसेवक कोरोना मदतकार्यात उतरले होते. देशभरात जीवनावश्यक ७३ लाख वस्तूंचे वाटप करण्यात आले तर साडेचार कोटी नागरिकांना भोजन वितरीत करण्यात आले. ९० लाख मास्कचे वितरण आणि २० लाख प्रवाशांना मदत करण्यात आली. भटके-विमुक्त समाजातील अडीच लाख नागरिकांना मदत करण्यात आली. ६० हजार युनिट रक्तदान करण्यात आले.
“गेल्या वर्षी जगात सर्वच कार्य ठप्प झाले होते. त्यामुळे संघाच्या शाखांच्या संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली, पण दुसरीकडे संघ स्वयंसेवक मात्र झोकून देऊन सेवाकार्यात जुंपले होते. शाखा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून, लवकरच त्यांच्या संख्येत वाढ होईल,” असा विश्वासही डॉ. दबडघाव यांनी व्यक्त केला. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १९ व २० मार्चला बंगळुरूला झाली. कोरोना तपासण्या व रुग्णसेवेत संलग्न सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्यकर्मी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य केले. सुरक्षा दले, शासकीय कर्मचारी, वित्तीय संस्थांतील कर्मचाऱ्यांसहित संघटित व असंघटित क्षेत्रातील अनेक समूहांच्या सक्रियतेमुळे कोरोना संकटातही जीवनाचा प्रवाह अबाधित राहिला. ही सारी कामे प्रशंसनीय असल्याचा ठराव सभेत झाल्याचे त्यांनी सांगितले.