पुणे : शहर परिसरात मंगळवारी (2 ऑक्टोबर) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड पडल्याच्या जवळपास 40 घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे झाली. कोरेगाव पार्क येथे रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम करत असताना अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे.
वादळी पावसाचा सर्वाधिक फटका येरवडा व कोरेगाव पार्क परिसराला बसला असून त्या ठिकाणी झाड पडल्याच्या जास्त घटना घडल्या. गल्ली क्रमांक 4 या ठिकाणी झाड पडून रस्ता बंद झाला होता. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील 2 रेस्क्यू वाहने याठिकाणी दाखल होती. घटनास्थळी चेनसॉच्या सहाय्याने झाड हटवण्याचे काम जवान करत असताना अचानक झाडाची सुस्थितीत असणारी एक मोठी फांदी जवानांच्या अंगावर उंचावरुन कोसळली. यामध्ये दलाचे 2 वाहनचालक व 3 फायरमन जखमी झाले. तसेच त्याठिकाणी असणारा एक नागरिक ही जखमी झाला आहे.
जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनचालक नितिन कांबळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असून दुसरे वाहन चालक बंडू गोगावले व फायरमन छगन मोरे, भूषण सोनावणे, आझीम शेख यांना मुका मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले.