मंचर - आंबेगाव येथे बिबट्याचा बछडा जेरबंद झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (24 मार्च) श्रुतिका थिटे या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सोमवारी बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात आले. मात्र पकडलेला बिबट्या नरभक्षक नसून त्याचा बछडा आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
साकोरे परिसरातील गाडे पट्टी येथे गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तिची पाच वर्षाची मुलगी श्रुतिका गेली होती. मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिका वर हल्ला केला तिला जबड्यात धरून बिबट्या पळू लागला. मात्र आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने श्रुतिकाला सोडून पळ काढला. या घटनेत श्रुतिकाचा मृत्यू झाला. दरम्यान वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी रात्रीच पिंजरा लावला. भक्ष म्हणून शेळी ठेवण्यात आली होती. रात्री बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. हा बछडा नर असून तो एक वर्षाचा आहे बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले. ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्या अद्याप मोकळा असल्याचे सांगितले. आज पकडलेला बिबट्याचा बछडा असून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने तातडीने पुन्हा पिंजरा लावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून एका पाच वर्षाच्या मुलीला ठार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. श्रुतिका महेंद्र थिटे (वय 5, रा. जऊळके. ता. खेड) असे बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. उस तोड सुरू असल्यामुळे बिबट्या आणि मानव संघर्ष वाढला आहे. रविवारी साकोरे येथे श्रुतिका व तिची आई स्वाती महेंद्र थिटे या मामा अंकुश कडूसकर यांच्याकडे राहण्यास आल्या होत्या. घरासमोरील शेतात जनावरांसाठी मका चारा तिच्या आजी कुसुम कडूसकर व स्वाती थिटे कापत होत्या. जवळच स्वाती खेळत होती. यावेळी मक्याच्या पिकात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक हल्ला करून श्रुतिकाला जबड्यात उचलून पळू लागला. यावेळी दोघींनी व श्रृतीने आरडाओरड केला. त्यांचा आवाज ऐकुन परिसरातील नागरिक धावून आले. तोपर्यंत बिबट्याने श्रुतिकाला टाकून धूम ठोकली. श्रुतिकाला गळ्याला बिबट्या चावल्याने गंभीर जखमा झाल्या. प्रदीप कडूसकर यांनी तिला तात्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. बिबट्याने श्रुतिकाच्या गळ्याला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
साकोरे ग्रामस्थांनी वनपरिमंडळ अधिकारी सोमनाथ कुंटे याना व मंचर पोलीस ठाण्याला घडलेल्या प्रकारची माहिती दिली होती. वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गाढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्याचे सहाय्यक वनरक्षक श्रीमंत गायकवाड, मंचर पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ, यांनी पंचनामा केला. वनखात्या तर्फे तात्काळ तीन लाख रुपये रक्कम संपूर्ण वैद्यकीय खर्च देण्यात येणार असून नुकसान भरपाई १२ लाख थिटे कुटुंबियांना त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे श्रीमंत गायकवाड यांनी सांगितले.