नद्यांचे प्रवाही राहणे अत्यंत आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:58 AM2018-09-30T00:58:12+5:302018-09-30T00:58:33+5:30
शैलेंद्र पटेल : जागतिक नदी दिन, जलस्रोत हेरिटेज व्हावेत
भारतातील सर्व नद्या वाहत्या राहिल्या पाहिजेत आणि त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी नदीप्रेमी लढत आहेत. सध्या आपल्या शहरातील मुळा-मुठा नद्या प्रदूषित झाल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणचे जलस्रोत बुजविण्यात येत आहेत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. झरे, जलस्रोतांचे पाणी ड्रेनेजमध्ये जात आहे. ते रोखले पाहिजे.
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आंतरराष्ट्रीय नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आम्ही नदीप्रेमी रविवारी (दि. ३०) एक दिवसीय उपोषण करणार आहोत. कारण नदी ही आपली जीवनवाहिनी आहे. तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या नदी दिनानिमित्त आम्ही सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. एक तर जे जिवंत पाण्याचे झरे आहेत. ते संरक्षित झाले पाहिजेत. कारण त्याचे पाणी थेट नदीला गेले तर नदी वाहती राहील. ओढे, नाले आणि नैसर्गिक जलस्रोत यांना जपलेच पाहिजे. त्यांच्याद्वारे दररोज हजारो लिटर पाणी वाहते. हे पाणी नदीला मिळाले, तर नदी कायम वाहत राहून ती प्रवाही होईल. त्यामुळे तिच्यात जिवंतपणा येईल. दुसरे म्हणजे जलस्रोत, विहिरी, झरे यांचे संरक्षण करायचे असेल, तर ते संरक्षित व्हायला हवेत. त्यासाठी गावाचा नकाशा, डीपी प्लान यामध्ये हे जलस्रोत दाखवले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात विकास करताना ते बुजले जाणार नाहीत. संबंधित ठिकाणी विहीर, पाण्याचा झरा आहे, हे लगेच लक्षात येऊ शकते. सर्व नकाशात जागा आरक्षित करून ते अधोरेखित करणे गरजेचे आहे.
तिसरे म्हणजे या जलस्रोतांचे अधिकार एकाच व्यक्तीकडे दिले पाहिजेत. कारण अनेक ठिकाणी त्याचे अधिकारी असतील, तर त्याबाबत कोणाला विचारणार? म्हणून एका व्यक्तीकडे अधिकार द्यावेत.
सध्या एखादा दोन पदरी रस्ता असेल, तर तो सहा पदरी करण्यासाठी भूसंपादन करण्यात येते. वाहने वाढत आहेत. त्यांच्यासाठी जागा तयार केली जाते. परंतु, नदी, नाले, ओढे यांची रुंदी उलट कमी केली जात आहे. खरंतर यांची रुंदी वाढवली पाहिजे. कारण हे जीवन देणारे प्रवाह आहेत. पण याकडे गांभीर्याने कोणीही पाहत नाही. त्यासाठी सध्या नव्या भूजल कायद्यासाठी आम्ही हरकती, सूचना पाठवत आहोत. नागरिकांनीही त्यात सहभाग घ्यावा. भूजल चांगले राहिले, तर पाणी मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी भूजलात पाणी मुरत असेल, तर त्याला वॉटर रिचार्ज एरिया म्हटले जाते. तो भाग संरक्षित केला पाहिजे. त्यामुळे पाऊस झाला की, पाणी मुरून भूजलाची पातळी संतुलित राहू शकते. मी गेल्या अनेक वर्षांपासून अजून एका गंभीर विषयावर काम करीत आहे. आपल्या शहरात आणि परिसरात जे जिवंत झरे आहेत, त्यांना हेरिटेजचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. हा विषयदेखील महत्त्वाचा आहे. जर हेरिटेजचा दर्जा मिळाला, तर हे जिवंत जलस्रोत भविष्यात लाखो लिटर पाणी देतील. शहरात अनेक ठिकाणचे जिवंत जलस्रोत बुजविले आहेत. बावधन परिसरातील राम नदीची हीच अवस्था आहे. सध्या नदीची स्थिती पाहवत नाही. ती सुधारली पाहिजे. गंगा नदी वाचविण्यासाठी स्वामी सानंदजी गेल्या काही दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही पुण्यातही उपोषण करीत आहोत. खरं तर स्वामी सानंद यांच्याकडे सरकारचे लक्षच नाही. हे लक्ष वेधण्यासाठी उद्या (दि. ३०) जलप्रेमी उपोषण करतील. नदी रुंद जागेत, बिनधास्तपणे वाहत राहिली पाहिजे, हाच एक आमचा ध्यास आहे.
मानव जातीला जिवंत ठेवणारे जलस्रोत जिवंत राहण्यासाठी भूजल मार्ग व पाणलोट क्षेत्राच्या जागा गृहीत करून त्यांचे संरक्षण गरजेचे आहे. कारण जलस्रोत जिवंत राहिले, तर आपल्याला लाखो लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. रविवारी (दि. ३०) जागतिक नदी दिन आहे. त्यानिमित्ताने तरी महापालिकेने याबाबत विचार करावा, यासाठी आम्ही नदीप्रेमी प्रयत्न करीत आहोत. कारण नदी ही जीवनदायिनी आहे, असे जलदेवता संघ अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.