चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 04:30 PM2018-12-06T16:30:32+5:302018-12-06T16:36:38+5:30
चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.
पुणे: चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पुर्ण झाले असून येत्या दोनच आठवडयात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी (दि. ५ ) सकाळी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत ही माहिती अधिकाºयांकडून देण्यात आली. वारसा हक्काची एक दोन प्रकरणे न्यायालयात असून त्याचा निकाल लागेपर्यंत संबधितांचे नुकसानभरपाईचे पैसे न्यायालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री बापट यांच्यासह महापालिका आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, केंद्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील तसेच महापालिकेच्या भूसंपादन व अन्य विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महापालिकेकडून भूसंपाद होत नसल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. महामंडळाने या रस्त्याच्या कामासाठी ४२१ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र १०० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच भूमिपूजन होऊनही भूसंपादनच होत नसल्याने हे काम रखडले आहे.
बैठकीत महापालिकेच्या वतीने ९० टक्के भूसंपादन झाले असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने भूसंपादनासाठी महापालिकेला १८५ कोटी रूपये दिले आहेत. त्याची मागणी करणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. जी थोडी जागा राहिली आहे त्यात वारसा हक्काचा प्रश्न असून तो न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या जागांबाबत जी काही नुकसान भरपाई असेल ती न्यायालयात जमा करावी व कामाला सुरूवात करावी असे बापट यांनी सुचवले. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तशी तयारी दर्शवली, मात्र शक्यतो संपूर्ण जागा ताब्यात घ्यावी असे त्यांनी सांगितले. एकदा काम सुरू झाले व नंतर न्यायालयाचा निर्णय किंवा अन्य काही अडचणी आल्या तर त्याचा कामावर परिणाम होतो असे ते म्हणाले.
कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याला प्रातिसाद मिळाला आहे. आता ठेकेदार कंपनी निश्चित करून कामाचा आदेश देणे बाकी आहे. त्यामुळे महामंडळाची तयारी पुर्ण झाली आहे. भूसंपादनाचा प्रश्नही आता बहु्अंशी निकालात निघाला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवड्यात कामाला सुरूवात होण्यास हरकत नसावी असे बापट म्हणाले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना होकार दिला असल्याची माहिती मिळाली. या उड्डाणपुलामुळे चांदणी चौकात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.