पुणे : फेडेक्स कुरिअर, एनसीबी, मुंबई क्राईम ब्रँचच्या फंड्याने नागरिकांना भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. एका पार्सल फ्रॉडच्या घटनेत तरुणीला चक्क ऑन कॅमेरा तपासणीचा भाग म्हणून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तुम्ही पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असून, बँक खाते दहशतवादी कारवायांसाठी लिंक असल्याची भीती तरुणीला घालण्यात आली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आयटी अभियंता असलेल्या २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. या तरुणीला ब्लॅकमेल करत पाच महिन्यांत तब्बल १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याबाबत विमानतळ पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तरुणीला नोव्हेंबर २०२३ मध्ये फेडेक्स कंपनी मुंबई आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. तिला सांगण्यात आले की, तिच्या नावाने तैवानला पार्सल चालले आहे. यात पाच पासपोर्ट, आयसीआय बँकेचे सहा क्रेडिट कार्ड आणि ९५० ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. हे पार्सल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईने पकडले आहे. तसेच तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याची भीती घातली. त्यानंतर तपासणीच्या नावाखाली १३ लाख ९४ हजार रुपये चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करून घेतले. तसेच आमची लेडी ऑफिसर बोलत असून, शरीरावरील तीळ स्काईप आयडीवरून दाखवण्यास भाग पाडले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करत आहेत.