पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन इराणी पर्यटकांना येथील स्थानिक तरुणांनी धक्काबुक्की करून त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, इराण देशातून पर्यटन व्हिसा वर आलेल्या महमद हुसेन ( वय २७) व महमद अबाद (२८) दोन इराणी पर्यटकांसोबत मुंबईतून पुण्यात येण्यासाठी एका टुरिस्ट कंपनीमार्फत कारसह चालक व एक गाईड सोबत देण्यात आला होता. माणिकबाग परिसरात आल्यानंतर खरेदीसाठी चालक व गाईड खाली उतरून किराणा दुकानात गेले. मात्र किराणा दुकानदार व त्यांच्यात वाद होत असल्याचे पाहून कारमध्येच बसलेल्या विदेशी पर्यटकांनी घाबरून स्वतः कार चालवत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याने किराणा दुकानात असणाऱ्या तरुणांनी कारचा पाठलाग करून पर्यटकांना धक्काबुक्की करीत कारच्या काचा फोडल्या. टुरिस्ट कंपनीने दिलेला चालक व गाईड मात्र किराणा दुकानदार बरोबर वाद झाल्यानंतर त्यांनी तेथून पलायन केले.
दरम्यान संबंधित पर्यटकांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पर्यटकांना तीन दिवसांनी मायदेशी परत जायचे असल्याने त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याचे समजते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणीच तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलिसांनी दिली.