साकारतोय ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’; महेंद्र भवरे यांचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:22 PM2017-12-01T15:22:29+5:302017-12-01T15:27:18+5:30
‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : १९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकाचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरु केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. हा इतिहास समाज, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा, यासाठी ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.
शाहू-आंबेडकरी साहित्याने समाजामध्ये प्रगल्भता निर्माण करण्याचे काम केले. या साहित्यातून तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण पहायला मिळते. साहित्याचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि अभ्यासकांना हा ठेवा उपयुक्त ठरावा, हे लक्षात घेऊन फुले आंबेडकरी वाङ्मय कोश निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. या कोशात आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील लेखक, त्यांचे साहित्यातील योगदान आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख आणि मुख्य संपादक डॉ. महेंद्र भवरे यांनी दिली.
या प्रकल्पासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून यात माजी कुलगुरु आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस, लेखक अर्जुन डांगळे, समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांचा समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
हा प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, डॉ. भवरे यांच्यासह राम दातोंडे, डॉ. शामल गरुड, डॉ. सुनील अवचार, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. शैलेंद्र लांडे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ. अशोक इंगळे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. सतीश वाघमारे, डॉ. सुनील चंदनशिवे आदींचा या प्रकल्पात समावेश आहे.
महाराष्ट्रातील फुले आंबडेकरी लेखक, साहित्यिक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते यांनी या प्रकल्पासाठी माहिती पाठवावी, असे आवाहन भवरे यांनी केले आहे. या माहितीमध्ये लेखकाची शैक्षणिक वाटचाल, व्यवसाय, प्रकाशित पुस्तके, पुस्तकाचे प्रकाशन वर्ष, प्राप्त झालेले पुरस्कार, पुस्तकाविषयी परीक्षण आणि समीक्षा आदी माहिती अपेक्षित आहे.