पुणे : “एक तारखेला पवार-फडणवीस एकत्र येणार असल्याची उत्सुकता पुणेकरांपेक्षा मीडियालाच जास्त होती. आम्ही एकत्र येणार असल्याची एवढी चर्चा केली की मला कळेना, आम्ही एकत्र येणार म्हणजे काय करणार? आम्ही एकत्र येऊन कुस्ती करणार? की गाणं म्हणणार?” असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ते म्हणाले, “दादा, आपण असे करू. एकतर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्ही माझ्याकडे या. मग चालू द्या दोन-तीन दिवस बातम्या.” पूर्व पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाला दोघांची उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, खरे तर महाराष्ट्राची परंपरा आहे. लोकविकासाच्या कार्यक्रमात सर्वांनी मिळून पुढे जायचे असते. याच संदर्भाने अजित पवार म्हणाले, “मीही दोन-तीन दिवस बघत होतो. सारखे तेच तेच. नवीन बातम्या दाखवायला नाही मिळाल्या की या बातम्यांना जोर येतो.”