पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१५) निधन झाले. पुण्यातील बाणेर भागातील राहत्या घरी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (दि.१६) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, कन्या सुजाता आणि राजश्री व मुलगा विश्वजित असा परिवार आहे.
विधी क्षेत्रात सावंत यांचा दरारा होता. परखड पुरोगामी विचारसरणी आणि पुरावाधिष्ठित न्यायनिवाडा या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी न्यायालयीन परिप्रेक्ष्यात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली सुुरू केली. सन १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून तर १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्षे त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.
न्यायमूर्तीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी न्यायनिवाडा करताना मूल्यांबाबत कधीही तडजोड केली नसल्याचे विधी क्षेत्रातून सांगितले जाते.
चौकट
पी. बी. सावंत यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
-१९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. १९९५ ते २००१ दरम्यान प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय लोकांच्या न्यायाधिकरणावर निवृत्त न्यायमूर्ती सुरेश होसबेट यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी १ सप्टेंबर २००३ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. त्यांनी आपला अहवाल फेब्रुवारी २००५ मध्ये सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते. परंतु, त्यांनी विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला होता.
-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या ट्रस्टमधून त्यांच्याच वाढदिवसासाठी २.३ लाख रुपयांच्या रकमेचा वापर करण्यात आला होता. ट्रस्टच्या पैशांचा वापर हा वैयक्तिक गोष्टींसाठी करता येत नाही, असे सांगून हा ट्रस्टचा भ्रष्टाचार पी. बी. सावंत यांनी समोर आणला. त्यावेळी अण्णा हजारे यांना त्याची कबुली द्यावी लागली.
-‘ग्रामर ऑफ डेमोक्रेसी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक गाजले. या पुस्तकात त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
------------------------------------------------