माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन चौथ्यांदा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:50 PM2023-03-26T14:50:55+5:302023-03-26T14:51:15+5:30
शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल आहे
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा आदेश दिला. याप्रकरणात भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी भोसले यांच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवालही दाखल झाला आहे.
समता तत्त्वांच्या कारणावरून, त्यांच्यावर असणाऱ्या दायित्वापेक्षा जास्त रक्कम वसूल झाल्याने भोसले यांना जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. मात्र, भोसले यांनी एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. दोन्ही न्यायालयापुढे याबाबतची माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक केली गेल्याने मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील ॲड. सागर कोठारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवालांबाबत आमदार भोसले यांचे सामूहिकरीत्या ४९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांसह १२ जणांना अद्याप अटक झाली नाही.
केवळ न्यायवैद्यक लेखा परीक्षा अहवाल दाखल झाला म्हणून घडामोडीत बदल झाला असे म्हणता येणार नाही. माजी आमदार भोसले यांच्या प्रभावामुळे लेखा परीक्षकाविरुध्द कारवाई झाल्याचे निदर्शनास आणून देत ॲड. कोठारी यांनी जामिनाला आक्षेप घेतला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली. ॲड. कोठारी व सरकार पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने भोसले यांचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळून लावला.