चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक
By admin | Published: February 16, 2017 02:55 AM2017-02-16T02:55:59+5:302017-02-16T02:55:59+5:30
गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना तब्बल ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात
पुणे : गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना तब्बल ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष जयवंत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली असून न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयवंत काशिनाथ पाटील (वय ६१, रा. ए/९, श्री चिंतामणी कॉम्प्लेक्स, मयूर कॉलनी, कोथरूड) असे त्यांचे नाव आहे. यापूर्वी शरद व्यंकटेश कुलकर्णी (वय ४४, रा. शाहूनगर, जयसिंगपूर, कोल्हापूर), प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (वय ४४, रा. मगदूम सोसायटी, जयसिंगपूर, कोल्हापूर), प्रसाद प्रभाकर वाळवेकर (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांना अटक करण्यात आलेली आहे. यातील कुलकर्णी आणि चव्हाण या दोघांना २५ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.
सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, तर वाळवेकर याला १६ जून २०१४ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. याप्रकरणी आशुतोष सदाशिव कुलकर्णी (वय ४२, रा. रघुकुल सोसायटी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार २० जानेवारी ते २१ डिसेंबर २०१२ दरम्यान घडला होता. आरोपींनी साई एक्स्पोर्ट कंपनीमार्फत दुबईमधील व्यापाऱ्यांना भाजीपाला निर्यात करीत असल्याचे तसेच मोठी आॅर्डर मिळाल्याचे सांगितले होते.
भांडवल कमी पडत असल्याचे सांगत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यावर दरमहा सात टक्के परतावा देण्याचे आमिषही दाखवले होते. परंतु, या कंपनीकडे निर्यात परवाना नसल्याने सांगली येथे श्री साई नावाची नवीन कंपनी सुरू केली.
या कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी ८६ लाख, तर इतर गुंतवणूकदारांकडून असे मिळून ६ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये चेक तसेच रोखीने घेतले. मात्र, परतावा तसेच गुंतवलेली रक्कम परत न देता फसवणूक करण्यात आली. (प्रतिनिधी)