माजी रणजी कर्णधार राजू भालेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 08:16 PM2018-04-14T20:16:41+5:302018-04-14T20:16:41+5:30
महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय 66 ) यांचे शनिवारी पुण्यात आजाराने निधन झाले.
पुणे : महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय 66 ) यांचे शनिवारी पुण्यात आजाराने निधन झाले.
भालेकर यांच्यावर ६ एप्रिलला दुसरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे.
17 फेब्रुवारी 1952 मध्ये पुण्यात जन्मलेल्या भालेकर 1972 -73 ते 1985-86 या काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलूत्वाची छाप पाडली. यादरम्यान 74 सामन्यांत त्यांनी 7 शतके आणि 18 अर्धशतकांसह 39.17च्या सरासरीने 3877 धावा केल्या. यात नाबाद 207 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या. किफायती आॅफ स्पिनर असलेल्या भालेकर यांनी 35 बळीदेखील घेतले. गोलंदाजीत 31 धावांत 4 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय कारकिर्दीत 11 ‘अ’ श्रेणी सामनेदेखील ते खेळले. 1975 ते 1977या काळात त्यांनी रणजी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
भालेकर यांचे खरे नाव राजेंद्र. मात्र राजू याच नावाने ते सर्वत्र ओळखले जायचे. क्रिकेटमधील योगदानामुळे त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पीवायसी हिंदू जिमखान्याचे ते दीर्घ काळ कर्णधार होते. गेली 5 वर्षे पीवायसीचे क्रिकेट सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या नेतृत्वात आणि नंतर मार्गदर्शनाखाली पीवायसीने अनेक स्पर्धा जिंकल्या तसेच अनेक गुणवान खेळाडू पुढे आले.