एखादा कोरोना संशयित असला तर त्याच्यापासून चार हात दूर राहणेच बरे, अशीच आजकाल सगळ्यांची मानसिकता आहे.आपल्याच नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी लोक धजावत नाहीत. तर बेवारस दूरच... पण समाजात आज अशीही काही माणसे आहेत, ज्यांच्यात माणुसकी सापडते. याचे उदाहरण म्हणजे मंचर येथील शिवसेनेचे माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि त्यांचे युवा सहकारी कल्पेश (आप्पा) बाणखेले, महेश घोडके,आकाश मोरडे,अक्षय चिखले, सुरज धरम ,शुभम गवळी,जयेश भालेराव,स्वप्निल लोखंडे,राहुल थोरात,सचिन मोरडे,गोटू शेटे, रुपेश(बंटी) मोरडे,सागर रेणुकादास,खुशाल गाडे व यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णवाहिका चालक गौरव बारणे,गणेश शिंदे हे होय.
गेल्या वर्षभरात या सर्वांनी मृतदेहाची कुठली हेळसांड न करता सर्वांचे धार्मिक विधी पूर्ण करून आजअखेर १०९ रुग्णांचे अंत्यविधी केले आहेत. या सर्वांना अंत्यविधीसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे साहित्य मंचर येथील प्रसन्न भागवत,अमोल पारेख,संजय गांधी (आळेफाटा) हे मेडिकल व्यावसायिक पुरवितात. दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीतून आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास वाढतो. त्यांच्या संवेदनशीलतेला समाजाने सलाम केलाय! या वर्षभराच्या काळात या तरुणांनी अनेक वेळा जीव धोक्यात घातला, पण यातील फक्त एकालाच कोरोना झाला. त्यालाही फार काही त्रास झाला नाही. हे फक्तं आणि फक्तं त्या कुटुंबियांचे आशीर्वाद व आपले सर्वांचे प्रेम यामुळे असे सांगून दत्ता गांजाळे म्हणाले, आम्ही मयत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करतोय. तुम्ही कमीत कमी रुग्णांना मदतीचा आणि आत्मविश्वासाचा हात द्या.
कोरोना आज आहे, उद्या जाईल, पण माणुसकी कायम राहील. आम्ही आमचे काम करतोय. तुम्ही कमीत कमी रुग्णांना मदतीचा हात आणि आत्मविश्वासाचा शब्द द्या, तोदेखील आज ऑक्सिजनएवढाच मोलाचा ठरेल.
कोरोनाची पहिली लाट आली. त्या वेळी गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यविधी केले होते. आता दुसऱ्या लाटेतही मयत कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यविधी दिवसा अथवा रात्री कधीही ही टीम करत असते. केवळ मंचर शहरच नाही तर बाहेरगावी जाऊनसुद्धा अंत्यविधी करावे लागतात. दोन दिवसापूर्वी भर पावसात जाऊन गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका गावात रात्री कोरोनाबाधित व्यक्तीचा अंत्यविधी केला. विशेष म्हणजे नातेवाईक हजर नसले तरीसुद्धा आपल्या घरातील व्यक्ती समजून विधिवत अंत्यसंस्कार केले जातात.