मंगलदास बांदल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, फसवणुक गुन्ह्याच्या तपासासाठी आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:02 PM2021-06-03T12:02:21+5:302021-06-03T12:05:07+5:30
बांदल यांचे मित्र मांढरे आणि बँकेचे माजी संचालक दौंडकर या तिघांनाही एक जूनपर्यंत होती न्यायालयीन कोठडी
शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांना (ता. २ जून) शिरुरन्यायालयाने दत्तात्रेय मांढरे फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्याचवेळी शिक्रापूर पोलिसांनी त्यांना पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या एका फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुन्हा अटक केली.
दरम्यान, बांदल यांचे मित्र असलेले दत्तात्रेय मांढरे यांच्या व्यवहारातील दस्त कुलमुख्त्यारपत्रावरही आणखी दोघांना अडकवल्याचा प्रकार उघड झाला आहे. बांदलांबरोबर अनेक दिवस मैत्री असलेले घोडगंगा सहकारी बॅंकेचे माजी संचालक रामहरी दौंडकर (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांनाही अटक झाली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील पाणीचोरीच्या गुन्ह्यात मंजूर अटकपूर्व जामीन मिळताच दत्तात्रेय मांढरे यांची बनावट दस्तऐवज व शिवाजीराव भोसले सहकरी बॅंकेच्या थकीत सव्वा कोटीच्या कर्जाच्या अनुषंगाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात त्यांना २६ मे रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
दरम्यान एक दिवस आधीच म्हणजे ३१ मेला मांढरे यांच्याच प्रकरणातील व्यवहारात केलेले कुलमुख्त्यारपत्रात बांदल यांनी मांढरें ऐवजी रामहरी दौंडकर व एस. जे. सातपुते यांना मांढरे म्हणून उभे केल्याचे पुढे आले. त्याच रात्री दौंडकर व सातपुते यांना अटक करण्यात आली आणि १ तारखेला न्यायालयाने तिघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या तिघांचीही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिरुर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याच वेळी शिक्रापूर पोलिसांनी बांदलांचा पुन्हा ताबा हवाय; म्हणून न्यायालयात अर्ज केला. कारण २२ मार्च रोजी मंदार पवार (रा. तळेगाव ढमढेरे) यांच्या तक्रारीनुसार शिक्रापुरातील कृष्णाजी ज्ञानोबा विरोळे यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतून काढलेल्या १ कोटी ७५ लाखांच्या कर्जासाठी पवार यांचे बोगस पॅनकार्ड, आधारकार्ड, प्राप्तीकरण विवरण पत्र वापरले होते. त्यात विरोळे यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरारी आहेत. भोसले सहकारी बॅंकेनेच मंदार पवार यांच्या प्रकरणातही बांदल यांचा सहभाग असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिसांकडे मंगळवारी (ता.१ जून) दाखल केल्याने बांदल यांना या नवीन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी शिक्रापूर पोलिसांनी आज शिरूर न्यायालयातूनच ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.