चाकण (पुणे) : महाळुंगे इंगळे (ता.खेड) येथील भर चौकात (दि. २६) रोजी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून करण्यात आला होता. या तरुणाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपींसह चार जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
संदेश बाबूराव भोसले (वय २१ वर्षे, सध्या रा.द्वारका सिटी, म्हाळुंगे, मूळ रा.जत) याने दिलेल्या फिर्यादीवरून १) अभिराज शिवाजी जावळे (वय २१वर्षे, रा.महाळुंगे), २) शंभू भोसले, ३) वैभव आंधळे, ४) विनोद बटलवार, ५) शेखर नाटक, ६) छोटा साकेत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून, छोटा साकेत फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, श्रीक्षेत्र महाळुंगे गावातील हॉटेल रेणुका ते ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रोडलगत प्रतीक गॅस रीपेरिंग दुकानाजवळ मयत रितेश संजय पवार( वय-३१ वर्षे) उभा असताना,आरोपी शंभू भोसले यांच्याशी झालेल्या वादातून शंभू भोसलेसह त्याच्या इतर पाच साथीदारांनी रितेश उभा असलेल्या रितेशवर लोखंडी कोयत्याने आणि लाकडी दंडक्याने जबर मारहाण केली. त्यात रितेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र संदेश बाबूराव भोसले (वय २१ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे.
फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याची पोलिस पथके, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पथके आरोपींच्या मागावर जाऊन त्यांनी २४ तासांत आरोपींना ताब्यात घेतले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष कसबे, सहायक पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण तपास करत आहेत.