पुणे : अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे. त्याचप्रमाणे कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेश पद्धतीतूनही अर्ज करण्याची मुभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेश आॅनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत. ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना पसंतिक्रम भरावे लागतील. निकाल लागल्यानंतर चार दिवसांत कोट्यांतील प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. अल्पसंख्याक कोटा तसेच माध्यमिक शाळेशी कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या महाविद्यालयांत इनहाऊस कोटा असतो. अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, तर इनहाऊस कोटा २० टक्के एवढा आहे. व्यवस्थापन कोट्यांतर्गत ५ टक्के प्रवेश देता येतात.अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यातील प्रवेशास दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होताच सुरुवात करावी लागणार आहे. परंतु, मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत कोट्यांतर्गत प्रवेश पूर्ण करणे अनिवार्य आहे. हे सर्व प्रवेश गुणवत्तेनुसार होणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक राखीव जागा ५० टक्के, इनहाऊस कोट्यातील २० टक्के जागांवरील प्रवेशाची माहिती संवर्गनिहाय आणि विद्यार्थ्यांच्या नावासह चौथ्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालकांच्या संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
‘कोटा प्रवेश’ निकालानंतर चार दिवसांत
By admin | Published: June 14, 2014 12:09 AM