पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़ १ व २ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल़ कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.२ जुलैला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल़ ३ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, तर४ जुलैला कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांत मुंबई, कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर, तसेच खान्देश आणि मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे आता पेरण्यांच्या कामाला वेग येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळच्या टप्प्यात गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडीसह काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळी आठपर्यंत आठ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून, १० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भोगावती नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
सांगली जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. चांदोली धरणाच्या पाणलोट मात्र सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात रविवारी पावसाचा जोर कायम सरी बरसल्या. दिवसभरात पाणलोट क्षेत्रात केवळ ४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा पाणलोटात चांगला पाऊस झाला. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीतील धबधबेही प्रवाही झाले आहेत. रत्नागिरीत जिल्ह्यातील ५ धरणे भरली आहेत.
हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडलेजळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे रविवारी पहाटे उघडण्यात आले. विदर्भात पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर येऊन धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
मराठवाड्यात धरणे कोरडीचमराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ७४३ गावे आणि २३८ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.कुठे किती पडला जून महिन्यात पाऊस ?सर्वसाधारणपेक्षा कमी : जून महिन्यात कोकणात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली. नंदुरबार, नाशिक, सांगली जिल्हा वगळता मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वसाधारणपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.सर्वसाधारण : महिनाभरात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा, धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे.