लोणीकाळभोरला तक्रार दिली म्हणून चौैघांना बेदम मारहाण : आठ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:29 PM2018-04-14T21:29:43+5:302018-04-14T21:29:43+5:30
सकाळी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या ११ साथीदारांच्या मदतीने चार तरुणांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाइपच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे.
लोणी काळभोर : सकाळी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या ११ साथीदारांच्या मदतीने चार तरुणांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाइपच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात दशहत निर्माण होऊन लोकांची पळापळ झाली. दुकानेही बंद करण्यात आली.
याप्रकरणात राज वलटे ( वय २४, रा. पठारेवस्ती ), अभिजित रामदास बडदे (वय २८, रा. अंबिकामाता मंदिर रोड, घोरपडेवस्ती), इनायत हसन खान (वय १७, रा. समतानगर, नुरीमस्जिद मागे ) व शुभम जयपाल सिंग ( वय २१, रा. पठारेवस्ती) हे चार जण जखमी झाले आहेत. यापैकी राज वलटे याच्या डोक्यात कोयता व तलवारीने वार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अभिजित बडदे याने दिलेल्या फिर्यादीवरून युवराज माणिक आंबुरे, फिरोज महम्मद शेख, इमरान मोहम्मद शेख, इफरान मोहम्मद शेख, अमन मौलोदिन शेख, राहुल वसंत उगाडे, समीर ऊर्फ मुन्ना सय्यद व गिड्ड्या ऊर्फ मौलोदिन शेख ( सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील युवराज आंबुरे हा सराईत गुन्हेगार आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इराणीवस्तीनजीकच्या मोकळ्या जागेत सलमान शेरखान पठाण, शुभम सिंग, इनायत खान, शाहरूख सय्यद, बबलू आदी मित्र बसलेले असताना आंबुरेसह त्याचे सात साथीदार आले. त्यांनी तुम्ही इथे का बसता? असे विचारले व शिवीगाळ करत इनायत खान यास लाथा-बुक्क्यांनी बेदाम मारहाण केली. यात खान यास हात-पाय व पाठीस जबर मुक्कामार लागला. काही वेळाने ते आठजण निघून गेले. खान यास अभिजित बडदे याने आपल्या मित्राच्या मदतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणले. परंतु, त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात पाठवले.
त्यानंतर बडदे व सलमान शेरखान पठाण हे दुचाकी (एमएच १२ एनएच ४६९४) वरून घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ते लोणी काळभोर गावातील पाषाणकर बाग चौकात आले असता अचानक समोरून पाच ते सहा दुचाकीवरून युवराज आंबुरे हा आपल्या साथीदारांसमवेत आला. ते शिवीगाळ करत गाड्यांवरून उतरले. तेव्हा युवराज आंबुरे याचे हातात कोयता, फिरोज शेख याचेकडे तलवार, इमरान शेख याचे हातात पाइप, इफरान शेख याचेकडे लोखंडी गज, अमन शेख याचेकडे स्टंप, राहूल ऊगाडे याचे हातात बॅट, समिर ऊर्फ मुन्ना सय्यद याचेकडे चाकू, व इतर दोन ते तीन अनोळखीचे हातात लोखंडी गज होते. आंबुरे बडदे याचेजवळ आला व तू आमचेविरोधांत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेला. तुझा माज उतरवतो. आता याला सोडू नका रे, असे म्हणत त्याने उलट्या कोयत्याने वार केला. बडदे याने तो उजव्या हातावर झेलला. सदर प्रकार पाहून तेथे उभा असलेला बडदे याचा मित्र राज वलटे हा भांडण सोडवण्यासाठी आला. त्यावेळी आंबुरे याने तुु याची बाजू घेतोस, तुला खलास करतो. असे म्हणत धारदार कोयत्याने त्याचेवर वार केला. सदर वार डोक्यात बसलेने वलटे रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याचवेळी सर्वजण बडदे व सलमान पठाण यास आपले हातात असलेल्या बॅट, स्टंप, पाईप, लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर आंबुरे याने मोठा दगड बडदे याचे दुचाकी वर टाकलेने मोठे नुकसान झाले. ते सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत आमच्या कोणी नादी लागायचे नाही. म्हणून आरडाओरडा करत होते. सदर दहशतीमुळे कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. घबराट पसरली त्यामुळे आठवडे बाजारात खरेदीसाठी निघालेले महिला व पुरुष सैरावैरा पळत सुटले. दुकानदारांनी दुकाने बंद केली. सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत शिवीगाळ करत दुचाकीवरून निघून गेले. जमलेल्या लोकांनी तीन जखमींना उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर ससून रुग्णालय पुणे येथे नेले. यामध्ये वलटे याचे डोक्यात आठ टाके पडले आहेत, तर बडदे यास गुडघा व हाताला, इनायत खान यास मांडी व छातीस आणी सिंग याचे पायास जखमा झाल्या आहेत.