पुणे : रात्री अकराच्या सुमारास(मंगळवार) सातारा रस्त्यावर सिटीप्राईड जवळील हॉटेल मैहफिल मधे आगीची घटना घडली. तेथील भटारखान्यामधे असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाचे तांडेल या पदावर असलेले किसन गोगावले(५५) व हॉटेल मैहफिलचे चार कर्मचारी आगीची झळ बसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली.
हॉटेल मैहफिलच्या भटारखान्यात आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर दलाकडून कात्रज व मुख्यालयातून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच आगीमुळे चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेल्याचे जवानांना समजले. त्याचवेळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु असताना दलाचे तांडेल किसन गोगावले व जवान चंद्रकांत गावडे हे आतमधे भटारखान्यात लिकेज झालेला सिलेंडर घेऊन बाहेर पडताच; त्याचक्षणी लिकेज गॅसचा स्फोट झाला. तेव्हा तिथे असलेले जवान विनायक माळी, दिगंबर बांदिवडेकर, मनीष बोंबले यांनी गोगावले व गावडे यांना तेथून बाहेर काढले. परंतू, तांडेल गोगावले यांना आगीची झळ बसल्याने तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात रवाना करण्यात आले. लिकेज झालेला सिलेंडर जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. अन्यथा अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागले असते. आता आग पुर्णपणे विझली असल्याची माहिती समजते.
हॉटेल मैहफिलचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे तांडेल गोगावले यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती दलाच्या जवानांनी दिली. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती दलाचे अधिकारी घेत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.