खेड तालुक्यात भिमानदी पुलावरून चारचाकी थेट पात्रात! नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:39 PM2021-05-24T14:39:10+5:302021-05-24T14:48:02+5:30
गाडीचा पुढचा टायर फुटल्याने सुटला ताबा
दावडी: खेड तालुक्यातील खरपुडी येथे भीमा नदीच्या पुलावरून जाणाऱ्या चारचाकीचा पुढचा टायर फुटल्याने थेट नदी नदीत पडल्याची घटना सकाळी घडली आहे. एका नागरिकाने तातडीने गाडीची काच फोडून चालकाला बाहेर काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. संतोष गाजरे (रा. तळेगाव ता मावळ ) असे चारचाकी चालकाचे नांव आहे.
खरपुडी खुर्दे ते खरपुडी बुद्रुक या दोन गावांना जोडणाऱ्या भिमानदीवर पुल आहे. आज सकाळी संतोष गाजरे हे सेझ प्रकल्प येथे कामासाठी त्यांची चारचाकी गाडी घेऊन जात होते. दरम्यान सकाळी आठ वाजता भिमानदी पुलावर आल्यानंतर गाडीचा पुढचा एक टायर अचनाक फुटला. वाहन व्हायबल होऊन चालक गाजरे यांचा वाहनावरील ताबा सुटला. पुलाचे ३ सिंमेट कठडे तोडून ते थेट नदीत मध्ये कोसळले. त्यानंतर मोठा आवाजही आला होता.
खरपुडी येथील शेतकरी किसन गाडे नदीकाठ लगत शेतात गवत कापत होते. गाडी नदीत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ते धावत पळत नदीत उतरले. गाडीत पाणी शिरल्यामुळे चालक गाजरे यांना दरवाजा उघडता आला नाही. गाडे यांनी क्षणांचाही विलंब करता प्रसंगावधान राखत गाडीची काच फोडली. दरवाजा ओढून गाजरे यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. अजून काही काळ गेला असता तर जीव गेला असता मात्र, किसन गाडे हे देवासारखे धावून आल्यामुळे माझा जीव वाचला अशी प्रतिक्रिया संतोष गाजरे यांनी दिली.
घटनास्थळी पोलिस हवालदार सुदाम घोडे यांनी जाऊन पंचनामा करून नदीत पडलेली चारचाकी क्रेनच्या मदतीने बाहेर काढली. खरपुडी येथील पुलावर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. बंधाऱ्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा असते. सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा पुलावरून वाहतूक करताना सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला. या पुलाला संरक्षक लोखंडी कठडे उभारावेत अशी मागणी खरपुडी गावचे पोलिस पाटील दादा निकाळजे, एन.टी गाडे, प्रदिप चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.