पुणे : आज काल छोट्या मोठ्या कारणावरुन तरुण तरुणी थेट समोरच्यावर हल्ला करीत असल्याचे दिसून येते. रस्त्यावर घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये बघ्यांची गर्दी दिसून येते. काही जण मोबाईलवर त्याचे शुटींगही करतात. असे व्हिडीओ व्हायरलही होतात, तेव्हा व्हिडिओ काढण्याऐवजी मदतीला का कोणी धावले नाही म्हणून टीकाही होते. पण भांडणे सोडविणाऱ्यावरच अनेकदा मोठे हल्ले होताना आता दिसू लागले आहे.बॉल का मारला म्हणून झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून एकाने क्रिकेटची बॅट गालावर मारुन हाड फ्रॅक्चर करण्याचा प्रकार आंबेगाव पठार येथे घडला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सागर कोळेकर (रा. आंबेगाव पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय अशोक घुगे (वय २२, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय हे आंबेगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी हॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी सागर कोळेकर याने जोरात बॉल मारला. तेव्हा त्यांचा मित्र हरिष वर्मा याने त्यास बॉल का मारला, असे विचारले असता दोघांमध्ये वाद सुर झाला. हा वाद अक्षय याने मिटवला. त्यानंतर अक्षय हे घरी जात होते. त्यावेळी सागर क्रिकेटची बॅट घेऊन तेथे आला. त्याने बॅटने अक्षय याच्या डाव्या गालावर जोरात मारली. त्याने अक्षयच्या गालाचे हाड फ्रॅक्चर झाले. सहायक पोलीस निरीक्षक धामणे अधिक तपास करीत आहेत.