मैत्रीला मिळाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:45 AM2017-08-07T03:45:31+5:302017-08-07T03:45:31+5:30
गर्दीने फुललेली शहरातील हॉटेल, मॉल आणि बागा... रंगीबेरंगी बँडनी सजलेले हात... सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा शुभेच्छांचा वर्षाव... अनेक वर्षांनी भेट झाल्याने रंगलेल्या गप्पा, अशा उत्साही आणि ताज्यातवान्या वातावरणात फ्रेंडशिप डे साजरा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गर्दीने फुललेली शहरातील हॉटेल, मॉल आणि बागा... रंगीबेरंगी बँडनी सजलेले हात... सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा शुभेच्छांचा वर्षाव... अनेक वर्षांनी भेट झाल्याने रंगलेल्या गप्पा, अशा उत्साही आणि ताज्यातवान्या वातावरणात फ्रेंडशिप डे साजरा झाला.
रविवारची सुट्टी आणि त्यात पावसाने घेतलेली रजा यामुळे मित्र-मैत्रिणींचे चमू कॅम्प, एफ. सी. रस्ता, जे. एम. रस्ता, एम. जी. रस्ता आदी ठिकाणी मनसोक्त बागडताना दिसले. फ्रेंडशिप बँड बांधून, भेटवस्तू देऊन मैत्रीदिनाची शोभा अनेक पटींनी वाढली.
मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे. आपल्या सख्या-सुहृदांना शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा केला जातो. ‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो. दरवर्षीच्या आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी तारीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
शहरातील विविध ठिकाणाप्रमाणेच सोशल मीडियावरील कट्ट्यांवरही मैत्रीच्या गप्पा रंगल्या. दिवसभरात मैत्री दिनाच्या शुभेच्छांमुळे एक प्रकारे मैत्रीचा जागर झाला. खरंच आहे मित्रांशिवाय जीवनाचा अर्थ शून्य! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वळणावर आपणापैकी काही मित्रांची साथ लाभली नसती तर आजवरची वाटचाल अशक्यप्राय अशीच होती. त्यामुळे हे असे मित्र खरंच केवळ आपल्या जीवनाचा ठेवाच नाही तर पुढे मार्गक्रमण करण्याची शक्तीच आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मनातील भावनांना वाट मिळाली.
मैत्रीदिनाच्या खूप शुभेच्छा... तुमच्यासारख्या लोकांमुळे आयुष्याला अर्थ आला.. असेच कायम सोबत रहा
‘मैत्री’ नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
‘मैत्री’ असावी रिमझिम सरीसारखी,
मनाला सुखद गारवा देणारी
‘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’
मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकेन का.. हे मला माहीत नाही... पण तुमच्या अडचणीत मी तुम्हाला एकट सोडणार नाही हे नक्की.
अशा शुभेच्छांचा वर्षाव झाला. शाळेत, महाविद्यालयात मैत्रीदिनाच्या दिवशी एकमेकांना आवर्जून भेटणारे मित्र-मैत्रिणी कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत. अशा वेळी फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.