मेरिटच्या आमिषाने होतेय फसवणूक
By admin | Published: July 27, 2016 04:02 AM2016-07-27T04:02:17+5:302016-07-27T04:02:17+5:30
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात खासगी क्लासचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे. मुलांना गुणवत्तायादीत आणण्याचे आमिष दाखवून पालकांकडून पैसे उकळले जातात.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात खासगी क्लासचा व्यवसाय तेजीत असल्याचे चित्र आहे. मुलांना गुणवत्तायादीत आणण्याचे आमिष दाखवून पालकांकडून पैसे उकळले जातात. अनेक क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. काही ठिकाणी तर मराठी माध्यमाचे शिक्षक इंग्रजी शिकवीत असल्याचे उजेडात आले.
‘लोकमत प्रतिनिधीं’नी आकुर्डी स्टेशन परिसरामधील भेट दिलेल्या एका कोचिंग क्लासमध्ये १५० विद्यार्थ्यांची एक बॅच याप्रमाणे दिवसातून चार बॅच घेतल्या जातात.
चार बॅचचे मिळून ६०० विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून एका विषयाचे तीन महिन्यांसाठी ५,५०० रुपये घेतले जातात. या हिशेबाने या क्लासची आकुर्डी येथील शाखेची तीन महिन्यांत सुमारे ३३ लाख रुपयांची उलाढाल होत असते. याच कोचिंग क्लासकडून पिंपरी आणि तळेगाव या ठिकाणीही प्रत्येकी दोन बॅच चालवल्या जातात. यावरून एखाद्या खासगी कोचिंग क्लासची एका वर्षाची आर्थिक उलाढाल किती असू शकते, याचा अंदाज येईल. विशेष म्हणजे खासगी कोचिंग क्लासची सरकार दप्तरी नोंद नसते. त्यामुळे यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तिकर विभागाकडून कोणताही कर आकारला जात नाही.
शाळेचे शिक्षकच ‘क्लास’चे टीचर
अनेकदा खासगी शिकवणी घेणारे शिक्षक हे कोणत्या तरी शाळा-महाविद्यालयांत नोकरी करीत असतात. शाळेत सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पाल्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य नाही,असे कारण देऊन हेच शिक्षक अनेकवेळा पालकांना आपल्याकडेच मुलांची खासगी शिकवणी लावण्यासाठी विनंती करतात. शाळेत भरमसाट पगार घेणारे शिक्षक खासगी क्लासमध्ये तासिका तत्त्वावर शिकवायला असतात.
ठिकाण :
निगडी बस स्टॉपजवळील क्लास
वेळ :
सकाळी ११
प्रतिनिधी : मुलाला सहावीत प्रवेश घ्यायचा आहे.
क्लासचालक : सात हजार सहाशे रुपये द्या.
प्रतिनिधी : काही डिस्काउंट?
क्लासचालक : आता अॅडमिशन घ्या, वीस टक्के कमी करतो. तेही हप्त्याने द्या.
प्रतिनिधी : शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आहेत का?
क्लासचालक : हो. थोडे दिवस इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचे शिक्षक शिकवीत होते. पण आत्ता तशी परिस्थिती नाही.
(प्रतिनिधीने पाहणी केली असता, क्लासमध्ये विद्यार्थी दाटीवाटीने बसलेले दिसले. त्यांच्याकडे कोणाचे लक्षही नव्हते. हीच परिस्थिती, चिंचवड, पिंपरी परिसरात दिसून आली.)
प्रतिनिधी : नमस्कार, छोट्या भावाला मेकॅनिकलच्या थर्ड इयरसाठी मॅथ्स लावायचा होता.
क्लासमधील व्यक्ती : बॅच कधीची पाहिजे?
प्रतिनिधी : किती बॅच आहेत?
क्लासमधील व्यक्ती : सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन.
प्रतिनिधी : संध्याकाळी ठीक आहे. फी किती असेल?
क्लासमधील व्यक्ती : ५,५०० रुपये.
प्रतिनिधी : खूप होतात ५,५०० हजार.
क्लासमधील व्यक्ती : अहो रिझल्टपण तसा आहे ना. म्हणून तर तीन ठिकाणी बॅच चालते माझी.
टीम लोकमत : अनिल पवळ, पूनम पाटील