पुणे : वायदे बाजारात केलेल्या सौद्याबाबतची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन दिलेल्या धनादेशाबाबत बँकेस स्टॉप पेमेंटच्या सूचना देऊन कमोडिटी कंपनीची तब्बल ५ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी केनेट कमोडिटीजचे संजय अरविंद शहा (वय ५२, रा. तेज ग्लोरी, भांडारकर रोड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी महावीर भिमराव छाजेड (रा. रविवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शहा यांचे केनेट कमोडिटीज आणि केनेट फायनान्स या कंपन्या आहेत. या कंपन्या सेबी अंतर्गत एनएसई व एम सी एक्सवर नोंदणीकृत आहे. कंपनीमार्फत त्यांच्या ग्राहकांसाठी ते सौदे घेत असतात. महावीर छाजेड हे त्यांचे २०१२ पासून ग्राहक आहेत. छाजेड यांनी २०१३ पासून एन. एस. इ. मध्ये सौदे करण्यास व रक्कम अदा करण्यास भाग पाडले. त्यांनी सांगितल्यानुसार कंपनीने सौदे केले. छाजेड यांच्यासाठी केलेल्या सौद्यांचे पैसे कंपनीने सेबीकडे जमा केले. मात्र, छाजेड यांनी आश्वासन दिल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी पाठपुरावा केल्यानंतर छाजेड यांनी दोन धनादेश दिले. मात्र, छाजेड यांनी बँकेस स्टॉप पेमेंटची सूचना दिल्याने ते न वटताच परत आले. आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे न देता कंपनीची ५ कोटी ६ लाख ४० हजार ९५५ रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहे.