ठेवीदारांची पावणेसात कोटींची फसवणूक; आदर्श पतसंस्थेतील तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:18+5:302021-02-06T04:18:18+5:30
पुणे : धनकवडीतील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या सहा कोटी ७८ लाख ५२ हजार रुपयांचा अपहार व ...
पुणे : धनकवडीतील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या सहा कोटी ७८ लाख ५२ हजार रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून पतसंस्थेतील व्यवस्थापकासह तीन जणांना अटक केली आहे.
पतसंस्थेच्या धनकवडी शाखेचे व्यवस्थापक काशीनाथ केरबा बनसोडे, रोखपाल गौतम नाना जोगदंड (दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी), लिपिक शंकर सटवा जोगदंड (रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदर्श पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात सहकारी संस्थेकडून लेखापरीक्षण करण्यात आले होते. लेखापरीक्षणात पतसंस्थेतील संचालकांसह कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर विशेष लेखापरीक्षक विलास काटकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने व्यवस्थापकासह तिघांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता मोरे, संजय कराळे, धनश्री सुपेकर, संदीप गिऱ्हे, अमृता हरबा यांनी ही कारवाई केली.
आदर्श नागरी पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे १६१ ठेवीदारांनी आतापर्यंत तक्रारी दिल्या आहेत.
-----------------------