पुणे : खासगी कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने महिलेची सव्वा नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केलेल्या आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विपिन अशोक यादव (वय २०, सेक्टन नं. ७, व्दारका, दिल्ली) असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी धानोरी येथील एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. १ ते ९ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपीने फिर्यादींना मार्च महिन्यात मोबाईलवरून संपर्क करून नोकरीविषयक संकेतस्थळावरून तुमचा बायोडाटा आमच्या कंपनीला मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना खासगी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मोबाईलवर लिंक पाठवित वेळोवेळी ११ लाख ६५ हजार ३८० रुपये जमा करायला लावले. त्यानंतर नोकरी मिळवून दिली नाही. तसेच घेतलेल्या पैशांपैकी २ लाख ४० हजार रुपये परत केले. तसेच उर्वरित रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीने ज्या हायरक्युलास इन्फो (ओपीसी) प्रा. लि. या कंपनीच्या नावे फिर्यादीची दिशाभूल करून पैसे घेतले. ही कंपनी आणि बँक खाते हे अटक आरोपी विपीन याच्या नावावर आहे. पुढील तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.