चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना 'भन्नाट' गिफ्ट ; सोशल डिस्टनसिंगचे मात्र तीन तेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:24 PM2021-06-09T16:24:19+5:302021-06-09T16:34:52+5:30
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उद्या (दि.१०) वाढदिवस आहे. या निमित्ताने पुणे भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता लोकोपयोगी कार्यक्रम करुन साजरा करण्यात येत आहे. पण या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी बुधवारी प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळाले.
भाजपच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी संघटनात्मक पातळीवर विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जात असतात. आज ( दि.९) देखील कोथरूड भागातील चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅसचे कुपन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मात्र,या उपक्रमाची माहिती मिळताच शहरातील रिक्षाचालकांनी सकाळपासूनच पाटील यांच्या कोथरूड येथील संपर्क कार्यालयाबाहेर गर्दी कऱण्यात सुरुवात केली. मात्र, या निमित्ताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्स, मास्क वापर यांसारख्या विविध नियमांचे तीनतेरा वाजलेले निदर्शनास आले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने पुणे भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात वंचित घटकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा देखील समावेश आहे. तसेच पुणे शहरातील रिक्षाचालकांना देखील या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट गिफ्टचे वाटप करण्यात येत आहे. रिक्षाचालकांना २०० रुपयांच्या सीएनजी गॅसची ५ कुपने मोफत दिली जाणार आहे. हे कुपन घेण्यासाठीच बुधवारी सकाळपासूनच पाटील यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. रिक्षाचालकांची मोफत सीएनजी गॅस कुपन घेण्यासाठी कर्वे पुतळा ते मृत्युंजयेश्वर मंदिरापर्यंत लांबच लांब रांग होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त वंचित घटकांच्या मोफत लसीकरणाची मोहीम सुद्धा हाती घेण्यात आली आहे. यासाठी देखील कुपन वाटप मंगळवारी करण्यात आले असून उद्या हे लसीकरण पार पडणार आहे. या लसीकरणाचा अनेकांना लाभ होणार आहे.