ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील ओतूर, अहिनवेवाडी, रोहोकडी शिवारात वाघाचा मुक्त संचार अधिक वाढल्याने शेतकऱ्यांची जनावरे व गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी प्रकर्षाने समोर आली आहे.
बुधवार, दि. ३० ऑगस्ट रोजी ओतूर अमिरघाट येथील अमोल वसंत ठिकेकर (वय ४५) हे आपल्या सासरवाडी अहिनवेवाडी येथे रात्री ८:३० वाजेदरम्यान मोटरसायकलवरून जात असताना बिबट्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे यांना मिळताच वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
शनिवार, दि. २६ ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या दरम्यान रोहोकडी नखलवाडी येथे बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून तीन महिन्याच्या गोऱ्यावर हल्ला केला. राजेंद्र जनार्दन मुरादे पहाटे तीन वाजेच्या दरम्यान कुत्रा का भुंकतोय, म्हणून घरातून बाहेर पाहायला आले असता त्यावेळी गोठ्यात बिबट्याने गोऱ्यावर हल्ला केला असल्याचे पाहिले व त्यांनी आरडाओरडा केला. तरी बिबट्याने तोंडातून गोऱ्या सोडले नाही. त्यांनी पुढे होऊन सोडवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याचा पंजा पायाला झटापटीत मुरादे यांना लागला. ते जखमी झाले बिबट्याने तिथून धूम ठोकली. या वेळी गोऱ्याच्या मानेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. मुरादे यांनी खासगी दवाखान्यामध्ये जाऊन प्राथमिक उपचार केले, असे सांगितले.
आतापर्यंत ओतूर व रोहोकडी वनपरिक्षेत्रातील परिसरात बिबट्या सातत्याने संचार वाढला आहे. शेतशिवारातील गोठ्यात बांधलेली जनावरे भक्ष्य ठरत आहे. त्यामुळे या भागातील व शेतकरी चांगलेच धास्तावलेत. मागील काही दिवसांपूर्वी याच रोहोकडी पांधी येथील शांताराम केरभाऊ मुरादे यांची गोठ्यात बांधलेल्या कालवडीची शिकार केली. महालक्ष्मीनगर येथेही असाच प्रकार घडला आहे. वारंवार या घटनांमुळे परिसरात दहशत कायम आहे. परिसरातील गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने रात्रीला नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी व या बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी ओतूर व परिसरातील गावातून नागरिकांची होत आहे.