पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार अशी घोषणा शिंदे सरकारने केली आहे. मात्र अद्याप एसटी प्रशासनाकडे याबाबत कोणताही अधिकृत निर्णय आलेला नाही. या योजनेचा लाभ किती ज्येष्ठांना होणार, योजना कशाप्रकारे राबवली जाणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला होता. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१६ ऑगस्ट) रोजी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवास भाड्यात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता ७५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना एसटी प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.
एसटीच्या सवलती कोणासाठी ?
एसटीतर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार, राज्य शासनाचे अधिकारी-कर्मचारी, अपंग व्यक्ती, आमदार-खासदार, पोलीस यांसह आर्मीच्या जवानांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येतो. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना बस पासची सोय देखील एसटी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटीने मोफत प्रवास ही योजना चांगली आहे. पण आता तब्येतीमुळे कितपत प्रवास करता येईल हे सांगता येत नाही. अद्याप या निर्णयानंतर कोणतीही अधिकृत माहिती एसटीकडे आलेली नसल्याने जेव्हा ही योजना सुरू होईल तेव्हा एसटीने नक्की एकदातरी प्रवास करीन.
- नारायण बादल
माझी अनेक दिवसांपासून राज्यातील महत्त्वाची देवस्थाने असलेल्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बहुदा माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत आहे. लवकरात लवकर ही योजना सुरू व्हावी हीच अपेक्षा.
- श्रीराम मुंडे