पुणे : एफटीआयआयच्या सिनेमॅटोग्राफीच्या दोन जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिवेआगर येथील डिप्लोमा शूटच्या चित्रीकरणादरम्यान झालेला अपघात हा निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे घडला असल्याचे सांगितले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये संस्थेच्या टीव्ही विभागातीलच तीन व्यक्तींचा समावेश केल्याने समिती पारदर्शकपणे निर्णय देणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असून, या समितीलाच सामोरे जाण्यास नकार दर्शविला आहे.
काही दिवसांपूर्वी एफटीआयआयच्या २०१३ च्या सिनेमॅटोग्राफीच्या शेवटच्या वर्षातील दोन विद्यार्थी डिप्लोमा फिल्म शूट करीत असताना क्रेनचा अपघात झाल्याने २२ फुटावरून खाली पडून गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये संस्थेचा दोन कोटी रुपयांचा कॅमेरादेखील तुटला. संस्थेच्या प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने ही गंभीर घटना घडली. याला कुलसचिवांसह सिनेमॅटोग्राफीचे विभागप्रमुख जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ज्यावेळी संचालक डॉ. भूपेंद्र कँथोला जखमी विद्यार्थ्यांना भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रकरणासाठी चौकशी समिती नेमली जाईल, असे सांगितले. त्यानुसार दोन ते तीन दिवसांमध्ये एक चौकशी समिती नेमण्यात आली.
या समितीमध्ये एफटीआयआयच्या बाहेरील व्यक्तींचा समावेश असावा तरच त्यामध्ये चौकशी होईल. याला मान्यता देऊन संचालकांनी बाहेरच्या व्यक्तींचीच चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु या पाच सदस्यीय समितीमध्ये दोन व्यक्ती बाहेरच्या आणि इतर तीन जण हे टीव्ही विभागातीलच समाविष्ट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.