पुणे : फिल्म अँड टेलिव्हीजन इन्सिट्युट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्याला संस्थेतून निलंबित करण्यात आले होते. यामुळे तो नैराश्यात असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
मनोज कुमार (वय 31, रा. वाराणसी) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मित्र विवेक केरकर याने डेक्कन पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. मनोज आर्ट डिरेक्शन अँड प्रोडोक्शन डिझायईन या शाखेचा 2016 मधील सत्राचा विद्यार्थी आहे. तो संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. दरम्यान, गेल्या महिन्यात प्राध्यपकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर संस्थेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबनाचे पत्रही त्याला देण्यात आले होते. यानंतर तो नैराश्यात होता. सोमवारी (दि. 14) पहाटे खोलीतून निघून गेला. दुपारी मनोज याचे पालकांनी त्याच्या मित्रांना फोनकरून मनोजचा फोन लागत नसून, तो खोलीवर आहे का, याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी तो खोलीवर नसल्याचे सांगितले. तसेच, त्याचा शोध घेतला. यावेळी तो बेपत्ता झाल्याचे समोर आले. मित्रांनी हॉस्टेलमधील सीसीटीव्ही पाहिले. त्यात तो पहाटे साडेचार ते पाऊणे पाच वाजण्याच्या सुमारास गेटवरून बाहेर पडून नळ स्टॉपकडे जात असल्याचे दिसत आहे, असे मित्रांनी पोलिसांना सांगितले. तो कारवाईमुळे नैराश्यात असल्याचेही सांगितले आहे. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.