जीवनाचा तोल सांभाळण्यास खेळ उपयुक्त - शिवानी शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:34 AM2018-03-07T02:34:30+5:302018-03-07T02:34:30+5:30

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल खूप अभिमान वाटतो. आपण जसे स्केटिंग खेळामध्ये तोल सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी डगमगतो तसेच अनेक अडचणी येतात. त्यांवर मात करून विजय मिळवून पुढे जातो. तसेच आयुष्याचेही असते. आपल्याला अनेक अडचणी, संकटे येतात, पण त्या वेळी न डगमगता आपण आपला तोल सांभाळून पुढे जायला हवे तरच आपल्याला यश मिळते, असे मत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त स्केटिंग खेळाडू शिवानी शेट्टी हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 The game is useful to manage the balance of life - Shivani Shetty | जीवनाचा तोल सांभाळण्यास खेळ उपयुक्त - शिवानी शेट्टी

जीवनाचा तोल सांभाळण्यास खेळ उपयुक्त - शिवानी शेट्टी

Next

शिवानी शेट्टी म्हणाली, मी वयाच्या चौथ्या वर्षी स्पीड स्केटिंग खेळायला सुरुवात केली. यासाठी खूप सराव केला. २००४मध्ये पहिली नॅशनल स्पर्धा झाली. त्यामध्ये सहभाग घेतला. २००६मध्ये पहिली ओव्हर आॅल नॅशनल चॅम्पियनशिप मेडल जिंकले. २०१०मध्ये बेल्जियमला ओपन वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळले. २०१४मध्ये चायना येथे एशियन चॅम्पियनशिप खेळले. मला आजपर्यंत नॅशनल ४१ पदके मिळाली आहेत. लहानपणापासून स्पीड स्केटिंग खेळाचा सराव करत असताना त्याचा समतोल कसा राखायचा याचा अंदाज होता. त्याचबरोबर या खेळासाठी मला पुष्कर कुलकर्णी, श्रीपाद शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. जेव्हा एखाद्या खेळाला आपण सुरुवात करतो तेव्हा आपले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे आकर्षण असते. पायाला चाक लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे त्यांना वाटते. पण, त्याचेही एक शास्त्र आहे, काही नियम आहेत हे त्यांना माहिती नसते. स्पीड स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. त्यामध्ये खेळाडूचा स्पीड खूप जास्त असतो. त्यासाठी हेल्मेट घालणे गरजेचे असते. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे. यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो.
स्केटिंग शिकणे खूप अवघड असते त्यामध्ये आवश्यक अटी असतात, संरक्षक गियर, एक गुळगुळीत रस्ता आणि अनुभवी प्रशिक्षक असणे महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक स्वत:च्या चुकांमधून शिकतात, नियमांनुसार सर्व काही केले तर व्यक्ती चांगल्या प्रकारे खेळू शकतो. स्केटिंगचा खेळाडू हा ताशी ३० किलोमीटर वेगाने सराव करत असतो. त्यामुळे एका तासात त्याच्या शरीरातील सहाशे कॅलरीज कमी होतात, फॅट कमी होतात. ३० मिनिटे स्केटिंग केल्यास हृदयाच्या ठोक्याचा दर एका मिनिटाला १४८ एवढा होतो. शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात, शक्ती वाढते. धावण्यापेक्षा स्केटिंग केल्यास शरीराच्या हाडातील ताण कमी होतो. नियमित सरावामुळे गुडघे व पायाची हाडे मजबूत होतात. पोटाचा व पाठीचाही व्यायाम होतो. स्केटिंग सराव करणाºयाचा दिवस आनंदित व चेतनाक्षम राहतो. संधिवात तसेच अन्य आजार असलेला व्यक्तीही स्केटिंगमुळे निरोगी व प्रफुल्लित होतो. स्केटर्स हा लांबचा पल्ला कमी वेळात गाठू शकतो. चढ किंवा उतार अगदी व्यवस्थित तोल सांभाळून पार करू शकतो.
यामध्ये रिंग, स्पीड, आर्टिस्टिक, फिगर स्केटिंग असे प्रकार या खेळात आहेत. रोलर स्केटिंगमध्ये आइस स्केटिंग, आइस हॉकी, आइस फिंगर, आइस स्किलिंग, आइस स्केट बोर्ड, रोलर हॉकी, रोलर स्केटिंग, रिंग स्केट, इन लाइन स्केटिंग, इन लाइन हॉकी असे प्रकार समाविष्ट आहेत. फिगर स्केटिंग म्हणजे संगीताच्या तालावर जोडीने जिम्नॅस्टिकची कौशल्ये दाखविणारा चित्तथरारक प्रकार आहे. स्केटिंगच्या सरावासाठी दोनशे मीटरचा ट्रॅक लागतो. या खेळासाठी सराव व त्याअगोदार फिटनेससाठी योगा, लेग स्टेचिंग, स्कीपिंग असे तणावमुक्त व्यायाम करावेत. व खेळासाठी आत्मविश्वास व चपळता या बाबी अंगीकारल्या पाहिजेत. तसेच स्केटिंग असा खेळ आहे, जो आपल्याला तोल सांभाळून खेळावा लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये न डगमगता मुला-मुलींनी आपला तोल सांभाळून कार्यामध्ये पुढे जाणे गरजेचे आहे. कोणताही खेळ आपल्याला जिंकण्याचे सामर्थ्य आणि हार पचविण्याची ताकद देतो. त्याचबरोबर आत्मविश्वास निर्माण करतो, असे शिवानीने सांगितले.

Web Title:  The game is useful to manage the balance of life - Shivani Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.