संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. पुढे जाऊन तेच पुण्यातील मानाचे गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. जाणून घेऊया पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची इतिहास...
श्री कसबा गणपती - मानाचा पहिला गणपती
पुण्याचे ग्रामदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कसबा गणपती प्रसिद्ध आहे. या गणपती मंदिराच्या जवळील लाल महालामध्येच शिवरायांचे बालपण गेले आहे. लोकमान्य टिळक यांनी उत्सवाला सुरुवात केल्यानंतर ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीलाच अग्रस्थान दिले. मानाचा गणपती असूनही पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय कोणताही डामडौल-भपका याशिवाय साधेपणाने उत्सव साजरे करणारे मंडळ म्हणून कसबा गणपतीची ख्याती आहे. वेगळ्या स्वरूपाचा देखावा-सजावट न करता साधी आणि नेटकी सजावट हे मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे वैशिष्ट्य आहे.
कसबा गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीपासूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती - मानाचा दुसरा गणपती
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या मुर्तीचे वैशिष्टय म्हणजे दरवर्षी या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्याने स्थापना करण्यात येते. तांबडी जोगेश्वरी हे पूण्याचे ग्राम दैवत आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वंयभू आहे.
कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात.
श्री गुरुजी तालीम गणपती - मानाचा तिसरा गणपती
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला 1887 मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला.
श्री तुळशीबाग गणपती - मानाचा चौथा गणपती
पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.
श्री केसरी गणपती - मानाचा पाचवा गणपती
पुण्यातला पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.