पुणे : गणरायाच्या स्वागताची घरोघरी उत्साहात तयारी झाली असून, आता फक्त बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचे वेध लागले आहेत. सजावट, पूजा साहित्य, विविध आभूषणे, याबरोबरच बाप्पाला आवडणाऱ्या नैवेद्याची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. उकडीचे मोदक गणपतीच्या आवडीचे, असे म्हणतात. त्यामुळे या मोदकांची लोकप्रियता कायम आहे. सर्व प्रकारचा प्रसाद घरगुती स्वरूपात तयार करून देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यातही उकडीचे मोदकच आघाडीवर आहेत.
बाजारपेठेत सध्या विविध प्रकारचे मोदक उपलब्ध आहेत. यामध्ये चॉकलेट मोदक, आंबा मोदक, चॉकलेट- पिस्ता मोदक, काजू मोदक, काजूकंद मोदक, ब्लूबेरी मोदक असे फक्त मोदकांचेच विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये पंचखाद्याचीही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे, तसेच आंबा मोदकात खवा नसल्याने, याला परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी अमेरिका, सिंगापूर, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांत बाप्पाचा प्रसाद पोहोचला आहे.
दूध व सुकामेव्याचे भाव वाढल्याने, त्याचा परिणाम खाद्य पदार्थांवरही दिसून येत आहे. मोदक, तसेच अन्य मिठाईच्या दरात काहीशी वाढ झालेली आहे. या संपूर्ण १० दिवसांच्या काळात जवळपास १० लाखांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मिठाईच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या आंब्याचा हंगाम नाही. मात्र, हापूस आंब्यापासून मोदक तयार करण्यात आले आहेत. यासाठी परदेशातूनही आम्हाला मागणी झाली असून, त्यांच्यापर्यंत प्रसाद पोहोचला आहे.
- मंदार देसाई, मिठाई व्यावसायिक.
उकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने केले जाते. कोणी हातवळणीचे करतात, तर कोणी मशिनमध्ये करतात. साधारणतः ३० ते ३५ रुपये नग असा दर असतो. एक महिना आधीपासूनच ऑर्डर घ्यायला सुरुवात केली जाते. मनुष्यबळानुसार ही ऑर्डर घरपोच दिली जाते किंवा ग्राहकांना घ्यायला यावं लागतं.
- गायत्री पटवर्धन
मोदकांची मागणी एरवी खूप असते, परंतु ४ दिवसांपासून ग्राहकांची खरेदीसाठी संख्या जास्त आहे, तसेच आम्ही तयार केलेल्या मोदकांना दरवर्षीच चांगली मागणी असते. यंदा त्यात वाढ झाली आहे.
- संजय चितळे, मिठाई व्यावसायिक.
आमच्या दुकानात गणेशोत्सव काळात १६ प्रकारच्या मिठाया आम्ही तयार करतो. वेगवेगळ्या राज्यातील मिठाईचा यात समावेश आहे. राजस्थानी, गुजराती प्रकारच्या मिठायांना चांगली मागणी आहे.
- सुनील गुंडाले, मिठाई व्यावसायिक.