पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यात यश मिळनासे झाले आहे. त्यासाठी उभ्या केलेल्या सर्व शेड बंद पडल्या असून नागरिकांमध्ये जागृती करणेही आता थांबले आहे. त्यामुळे कचरा डंप करण्याचे प्रमाण वाढले असून त्या-त्या परिसरातील नागरिकांचा त्याला विरोध सुरू झाला आहे. उभे केलेले प्रकल्प कालांतराने पुरेशा क्षमतेने चालत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे महापालिका प्रशासनाने असे लहान प्रकल्प उभे करण्याचे थांबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.कचरा प्रक्रिया प्रकल्पांना ओला व सुका कचरा वेगवेगळा लागतो. ओल्या कचºयापासून खत, गॅस तयार करण्यात येतो. त्यापासून वीज तयार करण्यात येते. तर सुक्या कचºयाचे रिसायकलिंग केले जाते. त्यातील उपयोगात येऊ शकणाºया वस्तूंचा उपयोग केला जातो. उर्वरत कचरा डंपिंग करण्यासाठी म्हणजे फुरसंगी, उरुळी देवाची येथील प्रकल्पांवर पाठवण्यात येतो. तिथे तो जमिनीत जिरवला जातो. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळाला तर कचरा व्यवस्थापनाची ही सर्व प्रक्रिया सुलभ होते, त्यामुळे पालिकेने गेली काही वर्षे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले.स्वच्छ या खासगी संस्थेचे त्यासाठी सहकार्य घेण्यात येत आहे. अन्य काही संस्थांही यात सहभागी आहेत. या संस्थांच्या कर्मचाºयांनी घरोघर जाऊन कचरा जमा केला जातो. नागरिकांनी त्यांच्याकडे ओला व सुका कचरा घरातच वेगळा करून द्यावा यासाठी महापालिकेच्या प्रबोधन मोहिम राबवण्यात येते. मात्र तिचा जोर आता कमी पडला आहे. त्यासाठी कचरा जमा करणाºया वाहनांमधून ध्वनीवर्धकांवर वाजवली जाणारी गाणीही बंद पडली आहेत.त्यामुळे महापालिकेकडे सध्या मिश्र कचराच जमा होत आहे. स्वच्छ संस्थेचे कर्मचारी कचरा फक्त जमा करतात. त्यांनी जमा केलेल्या कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेने काही कायम स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली. त्यासाठी शहरात अनेक ठिकाणी शेड बांधण्यात आल्या. या शेडमधून कचरा वर्ग करून नंतर तो कचरा वाहून नेला जात असे. वाहनांच्या अपुºया संख्येमुळे आता हेही काम होत नाही. त्यामुळे जमा झालेला सर्व कचरा आहे त्या वाहनांमधून डंपिग ग्राऊंडकडे नेण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.शहरात रोज साधारण १५०० टन कचरा जमा होत असतो. तो वर्गीकरण करूनच जमा होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र निम्म्यापेक्षा जास्त कचरा मिश्र स्वरूपातच जमा होत आहे. वर्गीकरण झालेला कचरा सामावून घेईल व त्यावर प्रक्रिया केली जाईल, अशी महापालिकेच्या प्रकल्पांची क्षमता राहिलेली नाही. मिश्र कचºयाचा वापर केला तर प्रकल्पांमधील यंत्रसामग्री नादुरूस्त होते. असे वारंवार होत गेल्यास प्रकल्पाची क्षमता कमी होते. त्यामुळे प्रकल्पांकडून शक्यतो मिश्र कचरा स्वीकारलाच जात नाही. शिल्लक कचरा व असा नाकारला गेलेला कचरा दोन्हीची रवानगी अखेरीस डंपिंग ग्राऊंडवर केली जाते.
कच-याचे वर्गीकरण कोलमडले, कर्मचारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 2:13 AM